‘सेम’ एआय फोटोसारखाच गणपती बाप्पा हवा, मूर्तिकारांकडे भाविकांचा आग्रह
मूर्ती घडविण्यासाठी महागाईचे विघ्न : साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्तींचे दर वाढणार, आगमनाची तयारी सुरू
मूर्तिकारांचे दिवस-रात्र काम सुरू : बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात, भाविकांचीही लगबग
वर्धा : दरवर्षी पारंपारिक पद्धतीने लाडक्या गणपती बाप्पाच्या मूर्ती घडविल्या जातात. यावर्षी मात्र, एआयच्या (AI) फोटोचा आधार घेत मूर्ती बनविण्यासाठी भक्तांचा मूर्तिकारांकडे आग्रह दिसून येत आहे. असा हुबेहूब मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांचा चांगलाच कस लागत आहे. यामुळे नेहमीपेक्षा आधीपासूनच मूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे.
दरवर्षीपेक्षा काही वेगळे बदलही मूर्तिकारांनी मूर्ती घडविताना केले आहेत. यावर्षी गणरायाला घडविण्यासाठी लागणारी लाल माती महागली आहे. सोबतच मूर्ती पूर्ततास जाण्यासाठी लागणारे तणसाचे दर वाढले आहेत. रंगाच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. सजावट साहित्यही महागले आहे.
यंदा गणरायाला घडविताना मूर्तिकारांना महागाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात १५० ते २०० मूर्तिकार आहेत. मूर्तिकारांकडून मूर्ती घडविण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून काहींनी दुकानेही थाटली आहेत. भाविकांच्या मागणीनुसार मूर्तिकारांनी मूर्ती साकारल्या असून त्यांच्या आता शेवटचा हात मारण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
या वस्तूंचे दर वाढल्याने मूर्तीच्या किमतीही वाढणार
मूर्ती घडविण्यासाठी लागणारी लालमाती महत्त्वाचा घटक आहे. यंदा ही माती महागली आहे. मातीचा साठा कमी होत असल्याने लालमातीच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी एक गोणी १०० रुपयांत मिळत होती ती आता १२५ रुपयांवर पोहोचली आहे. तणस पेंढीचा दर १०० रुपयांवरून दीडशे रुपयांवर गेला आहे. रंग ६०० रुपयांवरून ९०० रुपयांवर पोहोचला आहे. चांगल्या गुणवत्तेचा गोल्डन रंग ९०० रुपयांवरून १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे मूर्तीच्याही किमतीत वाढ होणार आहे.
अंतिम रूप देण्याची धडपड
अनेक ठिकाणी मूर्तीला मूळ रूप देण्यात आले आहे. त्याला रंग देण्याची प्रक्रिया काही मूर्तिकारांची सुरू आहे तर काहींचा अंतिम हात सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती घडविण्याची ऑर्डर दिल्या आहेत. त्यानुसार आपली मूर्ती रूपात आली की नाही, याची पाहणी मंडळांकडून केली जात आहे.
गणरायाच्या पोशाखात रंगाऐवजी वेल्वेटच्या कापडाचा आणि त्यात मोतीजडित वस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. गणरायाचे दागिने, फेटे, पितांबर आणि वस्त्र अशाच वस्तूंपासून बनविले जात आहेत. यामुळे या मूर्ती अधिकच आकर्षक दिसत आहेत.

