LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदिया एलसीबीचा दणका; आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

५ मोटारसायकलींसह २.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त!
५ ठिकाणचे गुन्हे उघडकीस, दोघांना अटक तर तिसऱ्याचा शोध सुरू
गोंदिया : गोंदिया जिल्हा आणि परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथकाने पर्दाफाश केला आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील तीन सराईत तरुणांनी गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणांवरून दुचाकींची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ गुन्हे उघडकीस आणत चोरीच्या ५ मोटारसायकलींसह एकूण २ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून एका फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.
दासगाव येथील तक्रारीवरून तपासाची चक्रे फिरली
दासगाव बु. (जि. गोंदिया) येथील रहिवासी सुखदेव कडू खरे यांच्या घराच्या पोर्चमधून ६ जुलै रोजी रात्री होंडा शाईन मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी रावणवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात विशेष पथक गस्त घालत होते.
तपासादरम्यान गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळाली की, मध्य प्रदेशातील बालाघाट भागातील काही तरुण गोंदिया जिल्ह्यात सक्रिय आहेत. मिळालेल्या माहितीवरून एलसीबी पथकाने तातडीने सापळा रचून वरुण जागेश खुळसाम याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपले दोन साथीदार निखिल राहांगडाले आणि नयन ठाकरे यांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध भागांतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी पाठलाग करून नयन ठाकरे यालाही अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोहवा संजय चौहान, दीक्षितकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, इंद्रजित बिसेन, सोमेन्द्रसिंह तुरकर, रियाज शेख, भोजराज बहेकार, विठ्ठल ठाकरे, राजकुमार खोटेले, पोशि छगन विठ्ठले, चापोशि राम खंदारे व विलेश ठाकरे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
अटक आरोपी व जप्त मुद्देमाल
अटक आरोपी:
१) वरुण जागेश खुळसाम (वय २१ वर्षे, रा. फुटारा, ता. खैरलांजी, जि. बालाघाट, म.प्र.)
२) नयन भानुप्रसाद ठाकरे (वय १९ वर्षे, रा. बल्लारपूर, ता. लालबर्रा, जि. बालाघाट, म.प्र.)
(तिसरा आरोपी निखिल सुंदरलाल राहांगडाले, रा. शिवनघाट, जि. बालाघाट याचा शोध सुरू आहे.)
जप्त वाहने (किंमत २ लाख १७ हजार ५०० रुपये):
काळ्या रंगाच्या ३ होंडा शाईन मोटारसायकली (किंमत रु. ५०,०००/-, ५०,०००/- व ६०,०००/-)
काळ्या रंगाच्या २ हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकली (किंमत रु. २७,५००/- व ३०,०००/-)
आरोपींनी या गाड्या दासगाव, रतनारा, दवनिवाडा, धामनेवाडा आणि गोरेगाव या भागांतून चोरल्याचे उघडकीस आले असून पुढील कारवाईसाठी मुद्देमालासह त्यांना रावणवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *