LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

महामार्गावर उभ्या कारला भरधाव ट्रकची धडक; चिमुकलीसह दोघांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर

नागभीड-ब्रह्मपुरी मार्गावरील कोरधा गावाजवळील भीषण अपघात विरली (बु.) गावावर शोककळा

लाखांदूर (भंडारा ) : तोंडावर पाणी मारण्यासाठी महामार्गाच्या कडेला उभ्या केलेल्या एका चारचाकी वाहनाला मागून आलेल्या भरधाव अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १२ वर्षीय बालिकेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा थरारक अपघात १९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास नागभीड–ब्रह्मपुरी महामार्गावर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यांतर्गत येणाऱ्या कोरधा गावाजवळ घडला. या दुर्घटनेमुळे लाखांदूर तालुक्यातील विरली (बु.) गावावर तीव्र शोककळा पसरली आहे. नितीन भरे (वय ३२, रा. बोंडेगाव, ता. ब्रह्मपुरी) आणि श्रावणी हिमेश बेदरे (वय १२, रा. विरली (बु.), ता. लाखांदूर) अशी अपघातातील मृतकांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे की, मारुती सुझुकी एस्टीम कारने (क्रमांक एमएच ३१ सीडी ९१८९) एकाच कुटुंबातील व नातेवाईक असलेले एकूण ८ जण प्रवास करीत होते. नागभीड येथील एका ढाब्यावर जेवण आटोपल्यानंतर सर्वजण नागभीड–ब्रह्मपुरी मार्गाने बोंडेगावच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान चालकाला थकवा आल्याने तोंडावर पाणी मारण्यासाठी त्यांनी कार कोरधा गावाजवळ महामार्गाच्या कडेला उभी केली. त्याच वेळी पाठीमागून सुसाट वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने उभ्या असलेल्या कारला मागून भीषण धडक दिली आणि ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. कारचा चक्काचूर, ६ प्रवासी गंभीर जखमीधडक इतकी जोरदार होती की कार रस्त्यावरून थेट बाजूला फेकली जाऊन तिचा पूर्णतः चुराडा झाला. अपघातात नितीन भरे आणि चिमुकली श्रावणी बेदरे या दोघांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तर मृत श्रावणीचे आई-वडील आणि भावासह गाडीतील अन्य ६ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमाकांत कोकाटे, सहायक ठाणेदार दिलीप पोटभरे, पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार व सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी नागभीड पोलीस फरार ट्रकचालकाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. एकाच कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण आघातामुळे विरली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *