राज्यांच्या सीमेलगत जिल्हा असल्याने आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येणार्या
त्रुट्या लवकरच दूर करण्यात येतील : पालकमंत्री इंद्रनील नाईक
गोंदिया : राज्यांच्या सीमेलगतचा गोंदिया जिल्हा असल्याने छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील रुग्ण इलाज करण्यासाठी जिल्ह्यात येतात. येणारे रुग्ण भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतात, मात्र योजनेअंतर्गत या राज्यांना महाराष्ट्र राज्यात रुग्णांचा होत असलेल्या इलाजाचा निधी मिळण्यास विलंब होत आहे, यातील त्रुट्या लवकरच दूर करण्यात येतील, यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हा विषय लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे, जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले.
नियोजन भवन येथे झालेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सनियंत्रण समितीच्या सभेत ते बोलत होते. सभेला सर्वश्री आमदार राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी.जायस्वाल, डॉ.जयंती पटले, डॉ.रोशन कानतोडे उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. नाईक म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाच्या आरोग्य विमा योजना आहेत. सध्या या दोन्ही योजना एकत्रितपणे राबविल्या जात आहेत, त्यालाच आता आयुष्मान भारत योजना असे नाव देण्यात आले आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता या एकत्रित योजनेअंतर्गत ज्यांनी आयुष्यमान कार्ड तयार केले आहे त्यांना प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळते. रुग्णालयात भरती झाल्यानंतरचा खर्च उदा. औषधे, तपासण्या, शस्त्रकिया या योजनेतून केला जातो. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला होता की, या योजनेचा गोरगरीब स्थानिक लोकांना वेळेवर लाभ मिळत नाही. तसेच गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील नागरिक गोंदिया येथे सदर योजनेअंतर्गत उपचारासाठी येतात. अशावेळी त्यांना वेळेत लाभ दिला जातो मात्र, दोन्ही राज्य सरकारकडून निधी येण्यास फार दिरंगाई होते. या योजनेतील त्रुट्या दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून यातील समस्या दूर करण्याचे त्यांनी आश्वासित केले.
आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड तयार करण्यामध्ये गोंदिया जिल्हा राज्यात तिसर्या क्रमांकावर आहे.
सद्यस्थितीत भारतात महिलांमध्ये गर्भाशय मुख कर्करोगाचा वाढता प्रसार बघता ‘एचपीव्ही’ लस १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना शासनामार्फत मोफत देण्यात येत आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षीत आहे. तरी पालकांनी कोणत्याही प्रसारमाध्यमांच्या अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलीला जवळच्या आरोग्य संस्थेत घेऊन जाऊन ‘एचपीव्ही’ लसीकरण करुन घेण्याचे आवाहन पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी केले.
०००००००

