LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

एसटी बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी, ७ जण गंभीर!

 गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील शिवणी गावाजवळील घटना; स्टिअरिंग लॉक झाल्याने अपघात
 गडचिरोली :
गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर शिवणी गावाजवळ शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी दुपारी राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस रस्त्याच्या कडेला उलटल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात एकूण ३८ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ७ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे, तर ३१ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली आगाराची MH-06-8848 क्रमांकाची बस सुमारे ६८ प्रवाशांना घेऊन चामोर्शीच्या दिशेने जात होती. दुपारी ३ वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणी गावाजवळ अचानक बसचे स्टिअरिंग लॉक झाले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला नाल्यात उलटली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सुनंदा रोहिदास उसेंडी (३५), आरती रमेश चतारे (२२), अश्विनी मनोज खेडेकर (२१), रीना यादव निकुरे (२१), अनिता बापूजी मोहुर्ले (६०), ऋतुजा सुनील बारसागडे (१८), रसिका भिवाजी बारसागडे (६५), शांताबाई यादव सोयाम (७०), गणेश श्रावण सोरते (५५), गजानन परशुराम बाबनवडे (५५), सुमनबाई सोनाजी उसेंडी (६०), तुळशीराम गणपत वाटगुरे (७६), निर्मला तुलाराम दामले (६५), लक्ष्मीबाई तुलाराम दरडे (६५), बापूजी करसाय (५०), राजपाल कवडू मडावी (७५), सुचिता राजेश मेश्राम (३७), बस चालक रुपचंद सिकंदर शेडमाके (४८) आणि वाहक तुळशीराम कुराडे (५४) यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
एसटी बसेसमधील तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी आलापल्ली-सिरोंचा मार्गावर टेकंमपल्लीजवळ अहेरी आगाराच्या बसचे मागील चाक निखळले होते, तर एटापल्लीत बसचा मागचा भाग तुटून पडला होता. बसेसचे टायर पंक्चर होणे, पावसाळ्यात छतातून पाणी गळणे आणि चालत्या गाडीचे भाग सुटे होणे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे आगारातून बस बाहेर सोडण्यापूर्वी तिची कडक तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *