LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

फ्लिपकार्ट कुरिअर हबमधून चोरीला गेलेला १.७० लाखांचा मुद्देमाल अवघ्या ६ तासांत हस्तगत!

गोंदिया शहर पोलिसांच्या डीबी पथकाची धडक कामगिरी
गोंदिया :
शहरातील फ्लिपकार्ट कुरिअर हबमधून अज्ञात चोरट्याने लंपास केलेला १ लाख ७० हजार रुपये किमतीचा महागडा मुद्देमाल अवघ्या ६ तासांच्या आत शोधून काढण्यात गोंदिया शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (DB Squad) संजयनगर मुरी मरघट परिसरामध्ये छापा टाकून पॅनॅसोनिक एसी आऊटडोअरसह ५५ इंचाचे चार महागडे स्मार्ट टीव्ही बेवारस स्थितीतून जप्त केले.
सविस्तर वृत्त असे की, हिरडामाली (ता. गोरेगाव) येथील रहिवासी विकास दिगंबर रहांगडाले (वय २८) हे गोंदिया येथील फ्लिपकार्ट कुरिअर हबमध्ये इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. दिनांक ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १:०० ते सकाळी ११:०० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने हबमधून १ नग पॅनॅसोनिक कंपनीचे एसी आऊटडोअर (किंमत ४० हजार रुपये), ३ नग सॅमसंग कंपनीचे ५५ इंचाचे टीव्ही (प्रत्येकी ३३ हजार याप्रमाणे ९९ हजार रुपये) आणि १ नग टीएलसी (TLC) कंपनीचा ५५ इंचाचा टीव्ही (किंमत ३१ हजार रुपये) असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या प्रकरणी विकास रहांगडाले यांच्या तक्रारीवरून २ नोव्हेंबर रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
मुरी मरघट परिसरातील माहिती अन् पोलिसांची धाड
गुन्हा दाखल होताच शहर पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बैस व डीबी पथकातील अंमलदार तपासकामी गस्तीवर निघाले. अवघ्या काही तासांतच गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, संजयनगर मुरी मरघट परिसरात संशयास्पद स्थितीत मोठ्या टीव्हीसारखे साहित्य लपवून ठेवण्यात आले आहे. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचांसमक्ष खात्री केली असता, फ्लिपकार्ट हबमधून चोरीला गेलेला सर्वच्या सर्व १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल बेवारस स्थितीत मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ६ तासांत मुद्देमाल शोधून काढल्याने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात धडक कारवाई
सदर उल्लेखनीय कारवाई गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, डीबी पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बैस, सहायक फौजदार केवलपालसिंग भाटीया, पोलीस हवालदार सुदेश टेंभरे, निशीकांत लोंदासे, कमलेश शहारे, पोलीस शिपाई दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे आणि राकेश डोंगरवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास मपोउपनि प्रियंका बैस करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *