पागोरा येथे प्लास्टिक कंपनीच्या प्रस्तावाला तीव्र विरोध; आक्रमक ग्रामस्थ उतरले रस्त्यावर!
विशेष ग्रामसभा घेण्याचा तगादा, कंपनीच्या दाव्यांना ग्रामस्थांचा विरोध
पहेला-अड्याळ (भंडारा) : पागोरा येथे प्रस्तावित ‘रिओल्फिन पॉली प्लास्ट प्रा. लि.’ या प्लास्टिक कंपनीच्या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रस्तावित जागेच्या अगदी जवळ जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी असल्याने लहान मुलांसह संपूर्ण ग्रामस्थांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याविरोधात आक्रमक झालेल्या महिला व पुरुष ग्रामस्थांनी शुक्रवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पागोरा परिसरातील सुमारे १९१ आर जमीन औद्योगिक वापरासाठी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. कंपनीचे संचालक किरीटभाई पटेल यांनी ग्रामपंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. मात्र, हा ठराव ग्रामस्थांना विश्वासात न घेता मंजूर करण्यात आल्याने ग्रामपंचायतीची ही परवानगी तात्काळ रद्द करावी आणि ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.
याप्रकरणी सरपंच शीला राऊत यांनी ग्रामस्थांसमोर आपली भूमिका मांडताना कबुली दिली की, कंपनीमुळे गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात; मात्र हा विषय अशा पद्धतीने पुढे जाईल याची आपल्याला कल्पना नव्हती आणि ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते. दरम्यान, कंपनीचे संचालक किरीट पटेल यांनी जमीन खरेदी करून रीतसर एनओसी घेतल्याचे सांगत, कंपनीच्या प्रक्रियेमुळे गावात कोणतेही प्रदूषण होणार नाही आणि आवश्यक सर्व नियमांचे पालन केले जाईल, असा दावा केला आहे. मात्र, ग्रामस्थांनी कंपनीचा हा दावा फेटाळून लावत आपला विरोध कायम ठेवला आहे.

