गोंदियात १५ ऑक्टोबरला भव्य ‘मेगा कॅम्प’; शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या दारी
‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत प्रशासनाचा पुढाकार; एसडीओ कार्यालयात पार पडली आढावा बैठक
गोंदिया : राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी गोंदियात भव्य ‘मेगा कॅम्प’चे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि १५ ऑक्टोबरच्या भव्य शिबिराच्या पूर्वतयारीसाठी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.या बैठकीला खासदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल, एसडीओ चंद्रभान खंडाईत, तहसीलदार शमशेर पठाण आणि पंचायत समिती अध्यक्ष मुनेश रहांगडाळे यांच्यासह विविध शासकीय प्रशासनिक विभागांचे प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

१५ ऑक्टोबरचा ‘मेगा कॅम्प’ हा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून कागदपत्रांतील त्रुटी तातडीने दूर करून पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जाणार आहे.मिळणारे प्रमुख दाखले व सेवा:जमिनीचे भाडेपट्टे, ७/१२ व ८-अ नोंदी, मालकी हक्कपत्रे, नॉन-क्रिमीलेयर, जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी, नवीन रेशन कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्रे, ज्येष्ठ नागरिक कार्ड, महिला आरोग्य तपासणी व ॲनिमिया जागरूकता, पाणी-वीज जोडणी, वन हक्क दावे आणि आधारकार्ड संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.सामाजिक उपक्रम अन् सार्वजनिक सहभागप्रशासन आणि नागरिकांमधील दरी कमी करून थेट संवाद साधण्यासाठी ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा मेरा योगदान’ हे उपक्रम राबवले जात आहेत. या मोहिमेदरम्यान रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, रस्ते सुरक्षा, महिला बचत गट संपर्क आणि डिजिटल साक्षरता यांसारखे विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम जिल्ह्यात राबवले जाणार आहेत.सर्व प्रशासकीय विभागांनी आपापल्या क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांची यादी व प्रलंबित प्रकरणे १५ ऑक्टोबरच्या आत वेळेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश यावेळी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

