Crime News; रेल्वेगाडीतून ४.२२ लाखाचा गांजा जप्त
‘लुसी’ने गांजा तस्करीचे बिंग फोडले
गोंदिया : रेल्वेगाडीने गांजा तस्करी केली जात आहे. अशी खात्रीशिर माहिती रेल्वे पोलिसांसह गोंदिया पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर काल (ता.४) जिल्हा पोलिस दलाच्या श्वान पथकातील ‘लुसी’ला रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले. दरम्यान सकाळी ११ वाजता सुमारास समता एक्सप्रेस रेल्वेगाडी स्थानकावर थांबताच ‘लुसी’ने शोधमोहिम सुरू केली. त्यातच डब्बा क्र.२ च्या बर्थ क्र.१ ते ३ च्या खाली असलेल्या दोन ट्रॉली बॅगमध्ये अंमली पदार्थ असल्याच्या सुचना पोलिस दलाला दिल्या. यावरून ४ लाख २२ हजार रूपये किंमतीचा २१ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पुढील तपास जीआरपीएफ करीत आहेत.काही दिवसांपूर्वीच गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीने गांजा तस्करी होत असल्याची बाब एका कारवाईच्या माध्यमातून समोर आली होती. त्यातच पोलिसांच्या कारवाईनंतरही गांजाची तस्करी सुरूच असल्याचे काल, ४ ऑगस्ट रोजी ‘लुसी’ने उघडकीस आणून दिले. समता एक्सप्रेस या रेल्वेगाडीने गांजा तस्करी होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथकासह पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच जीआरपीएफचे जवान स्थानकावर सक्रिय झाले. सकाळी ११:१० वाजता समता एक्सप्रेस गोंदिया येथे पोहोचताच ‘लुसी’ने शोध मोहिम सुरू केली. गाडी क्र.१२८०७ च्या कोच क्र.ए-२ च्या बर्थ १ व ३ च्या खाली असलेल्या दोन ट्राली बॅगकडे सुचना करीत लुसीने अंमली पदार्थ असल्याचे संकेत दिले. यावरून पोलिस पथकाने सदर बॅग ताब्यात घेवून पाहणी केली असता त्यामध्ये २१ किलो १०० ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले. परिणामी गांजा तस्करीचे बिंग फुटले. ही कारवाई जिल्हा पोलिस दलातील उपनिरीक्षक सतिश सिरीया, विजय ठाकरे, उमेश मारवाडे, पोहवा येरणे व रेल्वे पोलिस दलाचे पोनि सुनिल ऊईके, पोहवा किशोर ईश्वर यांनी केली. विशेष म्हणजे, या शोध मोहिमेत श्वान ‘लुसी’ची महत्वाची भुमिका राहिली. पुढील तपास गोंदिया रेल्वे पोलिस करीत आहेत.