LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात मोठी दुर्घटना: पाण्याने भरलेल्या खड्यात बुडून दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू!

भद्रावती तालुक्यातील पाचगाव येथील घटना; एक बाल-बाल बचावला, परिसरात शोककळा
भद्रावती (२५ जून):
चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. भद्रावती तालुक्यातील पाचगाव येथे शेतातील पाण्याच्या खड्यात बुडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण दुर्घटनेत कार्तिक सोनसखाडे (वय १२) आणि सानिध्य दुधनकर (वय १०) अशी मृत पावलेल्या निष्पाप बालकांची नावे आहेत. तर त्यांचा तिसरा मित्र आदित्य राऊत (वय १२) हा या दुर्घटनेतून बाल-बाल बचावला आहे. या घटनेमुळे पाचगाव आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शौचास गेले अन् पोहण्याचा बेत बेतला जीवघेणा!
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, २४ जून रोजी दुपारच्या सुमारास हे तिन्ही मित्र इरई धरणाच्या (इराई डॅम) क्षेत्रात असलेल्या मारोती दखरे यांच्या शेताच्या बाजूला गेले होते. तिथे शेतात फवारणीसाठी पाणी जमा करून ठेवण्यात आलेल्या एका मोठ्या पाण्याच्या खड्याजवळ ते शौचास गेले होते. त्यानंतर अचानक तिघांनीही त्या खड्यातील पाण्यात पोहण्याचा बेत आखला आणि ते पाण्यात उतरले.
मित्रांना बुडताना पाहून तिसरा धावला गावाकडे
पाण्यात पोहत असताना अचानक कार्तिक आणि सानिध्य या दोघांचा पाण्याचा अंदाज चुकल्याने त्यांचा समतोल बिघडला आणि ते पाण्यात बुडू लागले. आपल्या मित्रांना डोळ्यांदेखत बुडताना पाहून आणि त्यांना वाचवणे अशक्य असल्याचे समजताच तिसरा मित्र आदित्य प्रचंड घाबरला. त्याने तातडीने गावाच्या दिशेने धाव घेतली आणि ग्रामस्थांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
ग्रामस्थांनी काढले मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत दोन्ही मुले पाण्यात पूर्णपणे बुडाली होती. ग्रामस्थांनी पाण्यात शोधमोहीम राबवून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा केला. दोन्ही चिमुरड्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी भद्रावती पोलीस पुढील तपास करत असून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *