गुदमा-प्रताप बाग रेल्वे मार्ग: शेतकऱ्यांच्या जमिनीचे पुनर्मूल्यांकन करून थेट खरेदी करा!
खासदार राजेंद्र जैन यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही
गोंदिया : गुदमा ते प्रताप बाग दरम्यान प्रस्तावित नवीन रेल्वे लाईनसाठी आवश्यक असणाऱ्या जमीन भूसंपादनाबाबत खासदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांच्या भावना आणि आर्थिक हित लक्षात घेऊन जमिनीचे पुनर्मूल्यांकन (Revaluation) करण्याचे तसेच शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करण्याबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश खासदार राजेंद्र जैन यांनी आज (दि. १६) अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या या प्रकल्पामुळे कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा योग्य व रास्त मोबदला मिळेल, अशी ठाम ग्वाही या बैठकीदरम्यान खासदार जैन यांनी दिली. प्रस्तावित रेल्वे लाईनमुळे गोंदिया परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी व जमीनधारक प्रभावित होणार आहेत. जमिनीच्या मोजणीदरम्यान अनेक तांत्रिक त्रुटी राहिल्याच्या तक्रारी बाधित शेतकऱ्यांनी बैठकीत मांडल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत खासदार राजेंद्र जैन यांनी गोंदियाचे उपविभागीय अधिकारी (SDO), नगर रचनाकार आणि रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोजणीतील सर्व त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला ‘किसान संघर्ष समिती’चे अध्यक्ष अखिलेश सेठ, सचिव अमित बुद्धे, गोपाल चुटे, सुप्रीम बैस, राजू चन्नेकर, जीतलाल लिल्हारे चौरसिया, अय्यूब शेख, सूरज बावनकर, राजेश नागरिकर आणि धनलाल नागपुरे यांच्यासह विविध बाधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
थेट जमीन खरेदी : भूसंपादनाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरण्यासाठी थेट खरेदीचा (Direct Purchase) पर्याय स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले.
मोजणीतील त्रुटींचे निवारण : जमीन मोजणी दरम्यान झालेल्या चुका तातडीने दुरुस्त करून शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला मिळवून देण्याचे आदेश दिले.
ही गावे होणार प्रभावित
या रेल्वे प्रकल्पात गुदमा, आवरीटोला, चुलोद, गोंदिया खुर्द, कटंगी कला, नागरा, चांदनीटोला, गर्रा, सावरी, दागोटोला, दत्तोरा आणि घिवारी ही प्रमुख गावे प्रभावित होणार आहेत.

