Uncategorized

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांची कार १० फूट खोल दरीत कोसळली; चालक ठार, ७ महिला भाविक जखमी!

मध्य प्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यातील तीनखेडाजवळ भीषण अपघात जवाहरनगर परिसरातील सावरी गावावर शोककळा
जवाहरनगर (भंडारा): ऋषी पंचमीनिमित्त मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथे पवित्र स्नान आणि देवदर्शन करून परतणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. पांढुर्णा जिल्ह्यातील लोधीखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीनखेडा गावाजवळ महामार्गाच्या उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट १० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, ७ महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत.
आदित्य सुनील मांडरे (वय २४, रा. सावरी, ता. जवाहरनगर) असे मृत चालकाचे नाव आहे. जखमींमध्ये ५ महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
जामसावळी मारुती मंदिरात दर्शनाला जाताना घडला काळरात्रीचा थरार
प्राप्त माहितीनुसार, जवाहरनगर क्षेत्रातील सावरी येथील सुमारे २५ महिला भाविक ऋषी पंचमीनिमित्त १४ सप्टेंबर रोजी तीन खाजगी वाहनांनी मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथे नर्मदा स्नानासाठी गेल्या होत्या.
१५ सप्टेंबर रोजी वाटेत बांद्राभान संगम येथे स्नान करून त्या जामसावळी येथील जागृत हनुमान मंदिरात पहाटेच्या आरतीसाठी जात होत्या. दरम्यान, १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हायवेच्या उतारावर (MH 36 H 6703) क्रमांकाची कार अनियंत्रित होऊन खोल खड्ड्यात (दरीत) कोसळली.
खासदारांच्या पुढाकाराने तातडीने मदत; गुन्हा दाखल
अपघाताची माहिती मिळताच सावरीचे सरपंच गिरीश ढवकर यांनी तातडीने खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना संपर्क साधला. खासदारांनी तात्काळ भंडारा जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क करून जखमींवर तातडीने उपचाराची सोय करण्याचे निर्देश दिले.
मृत चालक आदित्य मांडरे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. लोधीखेडा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिकारी राम भरोसे शाहू आणि धुर्वे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *