HealthLatestगोंदिया- भंडाराविदर्भ

भुराटोला येथे जलसंधारण सप्ताहानिमित्त वृक्षलागवड व जलपूजन उत्साहात संपन्न!

आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन जलसंधारण व पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
तिरोडा :
लघु पाटबंधारे विभाग, तिरोडा यांच्या वतीने आयोजित जलसंधारण सप्ताहानिमित्त तसेच माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौजा भुराटोला येथे वृक्षलागवड व जलपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडले यांच्या हस्ते वृक्षलागवड आणि जलपूजन करून करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार विजयभाऊ रहांगडले म्हणाले की, “जलसंधारण हा केवळ शासनाचा उपक्रम नसून प्रत्येक नागरिकाची ती नैतिक जबाबदारी आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी पाणी टिकवून ठेवण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर, मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणे काळाची गरज आहे.”
जलसंधारणाच्या कामांना देणार गती
भुराटोला परिसरातील जलसंधारणाच्या विविध कामांकडे विशेष लक्ष देण्याची ग्वाही देत आमदारांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, भूजलपातळीत वाढ व्हावी आणि गावातील नैसर्गिक जलस्रोत वर्षभर प्रवाही राहावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबवल्या जातील. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून प्रत्येक रोपाची नियमित देखभाल व संगोपन करणे हीच खरी पर्यावरणाची सेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला जि. प. गोंदियाच्या सभापती रजनीताई कुंभरे, जि. प. सदस्य पवन पटले, तुमेश्वरीताई बघेले, पं. स. तिरोडाचे सभापती तेजराम चौहान, उपसभापती सुनंदाताई पटले, पं. स. सदस्य दिपालीताई टेंभेकर, ज्योतिताई शरणागत, भुराटोलाचे सरपंच चंद्रकुमार चौधरी, उपसरपंच विनोद उईके, उपविभागीय अधिकारी माळी, गट विकास अधिकारी कोल्हे यांच्यासह लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *