LatestNewsगोंदियाविदर्भ

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

मुरदोली शिवारातील पहाटेची घटना; धडक देऊन वाहनचालक पसार
देवरी (गोंदिया): देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मुरदोली शिवारात बुधवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवरील एका ५८ वर्षीय व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरा ३५ वर्षीय इसम गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक न थांबता वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. जयपाल राऊत (वय ५८ वर्षे, रा. म्हसवाणी, ता. सडक अर्जुनी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, विनोद राऊत (वय ३५ वर्षे, रा. म्हसवाणी, ता. सडक अर्जुनी) हे गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, जयपाल राऊत आणि विनोद राऊत हे दोघे बुधवारी पहाटे येरू सात्या आणण्याच्या कामानिमित्त एमएच ३५ एन ६७९१ (MH 35 N 6791) क्रमांकाच्या दुचाकीने गावातून राष्ट्रीय महामार्गाने निघाले होते. त्यांच्या पाठीमागेच गावातील काही सहकारी दुसऱ्या दुचाकीने जात होते. मुरदोली शिवारात पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये जयपाल राऊत यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तर विनोद राऊत हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून पाठीमागून येणाऱ्या सहकाऱ्यांनी व नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.
जखमीवर गोंदियात उपचार; देवरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन
अपघातानंतर स्थानिक नागरिक व सहकाऱ्यांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. गंभीर जखमी विनोद राऊत यांना तातडीने पुढील उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मृत जयपाल राऊत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
फरार वाहनचालकाचा देवरी पोलिसांकडून शोध सुरू
अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा देवरी पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे. महामार्गावरील विविध सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी केली जात आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची वार्ता समजताच म्हसवाणी परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *