LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया

नागरा शेतशिवारातील जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा! चारचाकी वाहनासह पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त६ जुगाऱ्यांना रंगेहात बेड्या!

गोंदिया (विशेष प्रतिनिधी): ग्रामीण भागातील शांतता भंग करून अवैध धंद्यांचे साम्राज्य पसरवणाऱ्या समाजकंटकांविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. मौजा नागरा शेतशिवारात ५२ पत्त्यांवर लाखो रुपयांची हारजीत लावून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ६ जुगाऱ्यांना रंगेहात जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी ६० हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि ४ लाख १० हजार रुपयांचे चारचाकी वाहन, जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जुगार माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार गोंदिया ग्रामीणचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक दीपम दहिवले यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक अवैध धंद्यांच्या नाकेबंदीसाठी गस्तीवर होते. दरम्यान, नागरा परिसरातील शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीची खात्री पटताच पोलिसांनी सापळा रचून २ ऑक्टोबरच्या सायंकाळी शेतशिवारात अचानक धाड टाकली. पोलिसांचा ताफा पाहताच जुगार अड्ड्यावर प्रचंड पळापळ झाली; काही जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, मात्र पोलिसांनी वेढा घालून ६ जुगाऱ्यांना जागीच पकडले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये नीलेश पन्नालाल मचाळे (वय ३५, रा. नागरा), प्रणय राजेश नागरीकर (वय २३, रा. नागरा), इरफान मुबारक शेख (वय ३४, रा. अंभोरा), आकाश शम्भूदयाल अग्रवाल (वय ४५, रा. सावरी), अनिल हेमराज बिसेन (वय ३०, रा. अंभोरा) आणि सुभाष राजाराम बान्ते (वय ४८, रा. नागरा) यांचा समावेश आहे. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगारासाठी वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला, पोउपअ दीपम दहिवले यांच्या नेतृत्वात सपोनि विरेंद्र भोसले, पोउपनि अंकित सोनवाने, सफौ नेताम, पोहवा देवा बहेकार, डिबे, भुते, सोनटक्के, भांडारकर, पोना मुळे, पोशि डोहळे, फसाटे, शहरे, ठाकूर व साखरे यांनी केली. ग्रामीण भागात चालणाऱ्या अशा अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *