LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

वाघाचा भीषण हल्ला; शेळ्यांसाठी चारा आणायला गेलेला वृद्ध शेतकरी ठार!

जांभळी वनपरिक्षेत्रातील झुरकूटोला येथील घटना
सडक अर्जुनी (गोंदिया):
गोंदिया जिल्ह्यामध्ये मानवी आणि वन्यजीव संघर्षाची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून जांभळी वनपरिक्षेत्रात एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या (चारा) आणण्यासाठी जंगल शिवारात गेलेल्या एका ७२ वर्षीय वृद्ध शेतकाऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. ही घटना आज दुपारी घडली. वातू बकाराम राऊत (वय ७२, रा. झुरकूटोला, ता. सडक अर्जुनी) असे वाघाच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वातू राऊत हे नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्यांसाठी झाडाचा पाला व फांद्या आणण्यासाठी गावाजवळील जंगल शिवारात गेले होते. दरम्यान, जंगलात आधीच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अनवाणी अचानक प्राणघातक हल्ला चढवला.
वाघाचा हा हल्ला इतका भीषण होता की वातू राऊत यांचा जागीच करुण अंत झाला. त्यांच्यासोबत जंगल परिसरात असलेल्या इतर शेतकरी व ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ पळ काढून गावात माहिती दिली.
घटनास्थळी पंचनामा व उत्तरीय तपासणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाटेकुर्रा येथील सरपंच प्रशांत बालसनवार यांनी तातडीने वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्रातील अधिकारी व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमॉर्टम) सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे झुरकूटोला व परिसरात भीतीचे सावट पसरले असून, हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *