गणेशोत्सवात लेझर लाईट अन् डीजेच्या आवाजावर कडक निर्बंध; जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत कडक इशारा!
गोंदिया जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन अलर्ट; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार थेट कायदेशीर कारवाई
गोंदिया : आगामी गणेशोत्सव जिल्ह्यात शांततेत, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडावा, यासाठी गोंदिया पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘जिल्हा शांतता समिती’च्या महत्त्वपूर्ण बैठकीत गणेशोत्सव रॅली आणि मिरवणुकांदरम्यान लेझर लाईट, मिड मिक्सर, मिक्सर लाईट आणि अनियंत्रित डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री. मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहरे, अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे, पोलीस उप-अधीक्षक (गृह), उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, शांतता समितीचे सदस्य व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकीत लेझर लाईट आढळल्यास कडक कारवाई!
पोलीस महासंचालकांसोबत झालेल्या व्हीसीमध्ये (Video Conferencing) दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची तातडीची बैठक घेण्यात आली आहे.
गणेशोत्सव रॅली किंवा विसर्जन मिरवणुकीत डोळ्यांना आणि आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या लेझर लाईट, मिड मिक्सर व मिक्सर लाईटचा वापर अजिबात होऊ नये, याबाबत स्पष्ट व कडक सूचना देण्यात आल्या आहेत. हे नियम मोडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.
पर्यावरण संवर्धन अन् ध्वनी मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन
बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्ती विसर्जन व मिरवणुकीदरम्यान पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस अधीक्षकांनी मंडळांना ध्वनी मर्यादेचे तंतोतंत पालन करण्याचे आणि गणेशोत्सवाचे मंडप (पँडॉल) उभारताना मुख्य रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई
उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील गुन्हेगार व गुंड प्रवृत्तीच्या घटकांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर डि.जे. मालक व गणेश मंडळांच्या स्वतंत्र बैठका घेऊन आवाजाची मर्यादा पाळण्याबाबत समज देण्यात आली आहे.

