LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

बसस्टॉपसमोरील रस्ता ओलांडताना घडला अपघात
देवरी (गोंदिया):
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर देवरी शहरातील बसस्टॉपसमोर रस्ता ओलांडताना भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला भीषण धडक दिल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा व देवरीतील उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दुर्योधन फुलचंद पुसाम (वय ३७, रा. खाडीपार, ता. सडक अर्जुनी) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
अपघाताचा थरार अन् तातडीची मदत
प्राप्त माहितीनुसार, रायपूरहून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या (MH 36 AA 2281) क्रमांकाच्या बोलेरो पिकअप वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या (MH 35 BE 6273) क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी दुर्योधन पुसाम यांना तात्काळ देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले.
देवरी शहरात उड्डाणपुलाची मागणी तीव्र!
देवरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. बसस्टॉप परिसरात रस्ता ओलांडताना दररोज अपघाताचा धोका निर्माण होत आहे. “देवरी शहरात उड्डाणपूल (Flyover) किंवा सुरक्षित क्रॉसिंगची व्यवस्था असती, तर हा अपघात टळला असता,” अशी संतप्त प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थितांनी दिली.
प्रशासनाने केवळ अपघात घडल्यानंतर कागदी घोडे नाचवण्यापेक्षा महामार्गावर उड्डाणपूल उभारून कायमस्वरूपी सुरक्षित वाहतूक व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या अपघाताची नोंद देवरी पोलिसांत झाली असून, पुढील तपास सुरू आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *