LatestNewsगोंदियाविदर्भ

तेलात तरंगत होत्या मृत माशा; ‘वैशाली राजपुरोहित स्वीट्स’चा परवाना निलंबित

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : ४९ किलो संशयित लाडू केले नष्ट; अस्वच्छतेचा कळस उघडकीस
गोंदिया
: शहरातील वाजपेयी वॉर्ड, दुर्गा मंदिराजवळ असलेल्या ‘मे. वैशाली राजपुरोहित स्वीट्स’ या नामांकित मिठाई विक्री केंद्रात अन्न सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे उघडकीस आले आहे. तळण्याच्या तेलात मृत माशा तरंगण्यापासून ते अस्वच्छतेचा कळस गाठणाऱ्या या पेढ्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी धडक कारवाई केली. नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ लक्षात घेता प्रशासनाने या आस्थापनेचा अन्न परवाना जनहितार्थ तात्काळ निलंबित केला असून, मानकांपेक्षा जास्त कृत्रिम रंग मिसळलेले ४९ किलो मोतीचूर लाडू जागेवरच नष्ट करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील नियमबाह्य खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, गोंदिया शहरात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व सकस खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी ओं. दे. लांजेवार यांनी FoSCoS प्रणालीद्वारे ‘मे. वैशाली राजपुरोहित स्वीट्स’ या अन्न निर्मिती व विक्री केंद्राची ऑनलाईन तपासणी केली. या तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना धक्कादायक वास्तव पाहायला मिळाले. दुकानात व कारखान्यात प्रचंड अस्वच्छता पसरली होती. डास आणि माशांचा मोठा प्रादुर्भाव होता. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे मिठाई तळण्यासाठी ठेवलेल्या तेलात दोन मृत माशा तरंगताना आढळून आल्या. तसेच शिजवलेले अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले होते आणि साठवणुकीसाठी वापरण्यात येणारे कप्पे पूर्णपणे गंजलेले व मळकट असल्याचे निदर्शनास आले.
इतकेच नव्हे तर, दुकानात १५ किलो खवा, ५ किलो कलाकंद आणि ८ किलो रसगुल्ला तयार असतानाही हे पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या दुधाच्या खरेदीची कोणतीही बिले किंवा अधिकृत नोंदी मालकाला दाखवता आल्या नाहीत. त्यामुळे हा माल कुठून आला, असा संशय बळावला आहे. कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, कर्मचारी अन्न हाताळताना बिनदिक्कत तंबाखू चघळत होते आणि त्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती. उत्पादनात मानकांपेक्षा जास्त प्रमाणात धोकादायक कृत्रिम रंगाचा वापर झाल्याचे स्पष्ट झाल्याने अधिकाऱ्यांनी ४९ किलो मोतीचूर लाडूंचा साठा तात्काळ जप्त करून नष्ट केला.
व्यवसाय करण्यास सक्त मनाई; कारवाईचा इशारा
या सर्व गंभीर त्रुटींमुळे नागरिकांच्या आरोग्यास थेट धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्याने, अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील तरतुदींनुसार पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) अमृता ला. शिर्के यांनी या पेढ्याचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित केला आहे. निलंबनाच्या काळात येथे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा अन्नपदार्थांची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून विक्री सुरू ठेवल्यास कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, तसेच जिल्ह्यातील अन्य अन्न व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन न केल्यास अशाच प्रकारचा बडगा उगारला जाईल, असा सक्त इशारा प्रशासनाने दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *