LatestNewsगोंदियाविदर्भ

पेन्शनच्या थकीत रकमेचा धनादेश देण्यासाठी लाच मागणारा कनिष्ठ सहायक ‘एसीबी’च्या जाळ्यात

गोंदिया पंचायत समितीत खळबळ!
गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गोंदिया :
पेन्शन दुरुस्तीनंतर मंजूर झालेल्या थकीत रकमेचा धनादेश (चेक) काढून देण्यासाठी एका ६४ वर्षीय सेवानिवृत्त महिला मुख्याध्यापिकेकडे पाच हजार रुपयांची लाच मागणारा गोंदिया पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अलगद अडकला. उर्वरित चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे पंचायत समिती वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
संदीप शाहूराव सानप (वय ३१ वर्षे, रा. कुडवा, गोंदिया; मूळ रा. वडझरी, ता. पाटोदा, जि. बीड) असे लाचखोर कनिष्ठ सहायकाचे नाव आहे.
तक्रारदार ६४ वर्षीय वृद्ध महिला या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, दवणीवाडा येथून डिसेंबर २०२० मध्ये मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त झाल्या होत्या. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पेन्शनमधून कपात होत असल्याचे आणि मिळणारी रक्कम कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कपात झालेली थकीत रक्कम व सुधारित पेन्शन मिळण्याबाबत पंचायत समिती शिक्षण विभागाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता. या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी त्या आस्थापना विभागातील कनिष्ठ सहायक संदीप सानप याला भेटल्या. त्यावेळी सानप याने “तुमचे थकीत बिल ५ लाखांच्या वर आहे, ते मंजूर करून धनादेश देण्यासाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील,” अशी उघड मागणी केली. तडजोडीअंती त्याने तक्रारदार महिलेकडून १ हजार रुपये आधीच उकळले होते, तर उर्वरित ४ हजार रुपये धनादेश तयार झाल्यावर देण्याचे ठरले.
मात्र, लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने संबंधित महिलेने गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. ‘एसीबी’च्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून पंचायत समिती परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून उर्वरित ४ हजार रुपयांची रोकड स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने संदीप सानप याला रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या.
गोंदिया शहर पोलिसांत गुन्हा दाखल
लाचेची रक्कम स्वीकारल्याचे पंचांसमक्ष निष्पन्न झाल्यानंतर आरोपी कनिष्ठ सहायक संदीप सानप याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये (PCA) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविसकर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी व पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी अरविंद राऊत यांनी केले. पथकात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, सहायक पोलीस उपनिरीक्षक करपे, पोलीस हवालदार बोहरे, कहालकर, पोलीस अंमलदार शेंडे, बोपचे, कापसे, काटकर, सोनवणे, पटले आणि डांगे यांचा सहभाग होता.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *