LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

जिल्ह्यातील 41 मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर राबविण्यात येणार -जिल्हाधिकारी प्रजित नायर

गोंदिया : महसूल व वन विभाग राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्या त्वरित निकाली काढण्यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यातही या अभियानाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 41 मंडळात हे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे, तिरोडा तहसिलदार नारायण ठाकरे उपस्थित होते.

जिल्ह्यात विमुक्त भटक्या जमातीचा समाज मोठ्या प्रमाणात असून ही लोकसंख्या तांडा परिसरात राहते. या परिसरात जाऊन तिथल्या लोकांना या शिबिराचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती नायर यांनी दिली. यासह जिल्ह्यातील सिकलगार आणि नाथजोगी समाज ही राहतो यांनाही या अभियानांतर्गत लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. *जिल्ह्यातील नागरिक घेऊ शकतील लाभ* सदर शिबिरांमध्ये नागरिकांना विविध महसूल सेवा एकाच ठिकाणी एक खिडकी व्यवस्था द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 व 8अ उताऱ्यांची दुरुस्ती व वितरण, उत्पन्न, रहिवासी, जातीचे व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण, अकृषक आकारणी अनुषंगाने वन टाईम प्रिमियम भरुन घेणे, अकृषिक (NA) मार्गदर्शन व सुधारणा, भोगवटदार वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघटनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप व ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत केली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. तरी नागरिकांनी या समाधान शिबिरांचा लाभ घ्यावा व महसूल विषयक प्रलंबित प्रकरणे, अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. गोंदिया तालुक्यात गोंदिया मंडळ स्तरावर दि.7 मार्च रोजी जलाराम लॉन, फुलचूर (गोंदिया) येथे व 14 मार्च रोजी कुडवा मंडळ स्तरावर टी.बी. टोली ग्राउंड, कुडवा (गोंदिया) येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *