LatestNewsगुन्हेवार्तागोंदियाविदर्भ

भवभूती महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक चंद्रशेखर दहीकर यांची निर्घृण हत्या!

शेतशिवारात विटांनी ठेचून संपवले; आमगाव तालुक्यातील बोथलीत थरकाप
पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी!
आमगाव (गोंदिया ):
आमगाव तालुक्यातील बोथली येथील शेतशिवारात एका माजी प्राध्यापकाची विटांच्या तुकड्यांनी अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक व थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. भवभूती महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक चंद्रशेखर भास्करराव दहीकर यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांच्या शेतातील निवासस्थानासमोरील वनजमिनीवर आढळून आला. भरवस्तीपासून दूर शेतात एकट्या राहणाऱ्या माजी प्राध्यापकाची अशा प्रकारे क्रूर हत्या झाल्याने संपूर्ण आमगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर दहीकर हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील रहिवासी होते. त्यांनी सन १९८८ मध्ये आमगाव येथील नामांकित भवभूती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ (सुमारे १६ वर्षे) ज्ञानदानाचे कार्य केले होते. महाविद्यालयातील सेवेतून बाहेर पडल्यानंतर ते ठाणाटोला-जवरी मार्गावरील बोथली शिवारात असलेल्या आपल्या शेतातील घरात एकटेच राहत होते आणि तेथे कुक्कुटपालन व्यवसाय सांभाळत होते. मंगळवार, २७ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवून विटांनी ठेचून त्यांची निर्घृण हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
बुधवारी सकाळी लगतच्या शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला दहीकर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्याने तातडीने बोथलीच्या सरपंचांना माहिती दिली आणि त्यानंतर आमगाव पोलीस ठाण्याला पाचारण करण्यात आले. घटनेची भीषणता पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी नंदिनी चानपूरकर आणि ठाणेदार निळकंठ कुकडे यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आमगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि तपासाबाबत स्थानिक पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. एकटे राहणाऱ्या निवृत्त प्राध्यापकाची इतक्या निर्घृणपणे हत्या करण्यामागे जुना वाद, संपत्तीचा तंटा की चोरीचा उद्देश होता, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. हत्येचे नेमके गूढ उकलण्यासाठी आणि मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी आमगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *