तीन दिवसीय राज्यस्तरीय विशेष उद्योजक प्रदर्शनाचे आयोजन
या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट दयावी
स्टॉल बुंकिंग व अधिक माहिती साठी व्यवस्थापक ओमकार मिलिंदराव हरदास संपर्क साधावा
भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही एक स्वायत्त संस्था आहे. जी महाराष्ट्र शासनाने स्थापन केली आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/ महामंडळा मार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अश्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील युवक – युवतींना संशोधन, कौशल्यविकास व प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून सक्षम करून विकास घडवणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. 22 ऑगस्ट 2019 रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयाद्वारे ‘अमृत’ या संस्थेची स्थापना केली. सुमारे 25 योजना अमृत संस्था संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रभावीपणे राबवित आहे.
अमृतचे ध्येय राज्यातील प्रत्येक नागरिकाला संशोधन, प्रशिक्षण आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच युवकांना कौशल्य विकासाद्वारे सक्षम करणे हे आमचे ध्येय असून त्याकरिता विविध योजना तसेच उपक्रम राबवित आहोत. खुल्या प्रवर्गातील तरुण-तरुणींना उद्योग क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळावी तसेच उद्योजकांना थेट ग्राहकांशी संवाद साधण्याचे प्रभावी व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (AMRUT) संस्थेच्या वतीने ‘अमृत पेठ’ या राज्यस्तरीय विशेष उद्योजक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य प्रदर्शन २०, २१, २२ मार्च 2026 या तीन दिवसादरम्यान राजस्थानी भवन, भंडारा येथे आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन २० मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या प्रदर्शनात भंडारा जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील उद्योग,लघुउद्योग,सूक्ष्म उद्योग, गृहउद्योग, महिला बचत गट, स्टार्टअप उपक्रम, हस्तकला क्षेत्रातील कारागीर, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, सेवा क्षेत्रातील उद्योजक तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करणारे नवउद्योजक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या माध्यमातून स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या विविध दर्जेदार उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे.
अमृत पेठ’ या उपक्रमामागील मुख्य हेतू म्हणजे नवउद्योजकांना नवी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना व्यापक व्यासपीठ प्रदान करणे, त्यांच्या ब्रँडची ओळख निर्माण करून देणे आणि उद्योजकांचा आत्मविश्वास वाढविणे हा आहे. याशिवाय, स्थानिक पातळीवरील उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, स्वदेशी उद्योगांना बळकटी देणे आणि “लोकल टू ग्लोबल” या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देणे हेही या प्रदर्शनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारची हस्तकला उत्पादने, पारंपरिक व आधुनिक खाद्यपदार्थ, घरगुती उद्योगातील उत्पादने, कृषीपूरक उत्पादने, नाविन्यपूर्ण स्टार्टअप कल्पना आणि सेवा क्षेत्रातील उपक्रम एकाच छताखाली पाहण्याची व खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच उद्योजकांना ग्राहकांच्या थेट प्रतिसादातून आपल्या उत्पादनांची गुणवत्ता व बाजारपेठेतील मागणी याची माहिती मिळणार आहे.
‘अमृत पेठ’ हे प्रदर्शन केवळ एक विक्री-प्रदर्शन नसून नव्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल घडवणारे आणि स्वदेशी उत्पादनांच्या प्रसारासाठी प्रेरणा देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या उपक्रमातून “मेक इन इंडिया” या संकल्पनेला अधिक बळ मिळण्यास मदत होणार असून स्थानिक उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. या प्रदर्शनाला भंडारा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्टॉल बूकिंग व अधिक माहिती साठी व्यवस्थापक ओमकार मिलिंदराव हरदास यांच्याशी ९११२२२८७७५, ८८५७९३४७३२,अमृत मित्र हेमंत चंदवासकर ९३२५१७३४४५, अमृत सखी कु. साक्षी जोशी ८६०५९८४३५८ संपर्क करावा.

