LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

तान्ह्या पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले!

मांगली-बांध येथील अतिशय दुर्दैवी घटना;उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू
पालांदूर (भंडारा) : डोक्यावर बचत गटासह खाजगी कर्जाचा वाढता बोजा आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक ताण असह्य झाल्याने मांगली (बांध) येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आपले जीवन संपविले. अगदी तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (शुक्रवार, ११ सप्टेंबर) घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
राजकुमार मारोती बारसागडे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ते शेतावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा अनमोल बारसागडे शेतावर गेला असता वडील झोपलेल्या अवस्थेत अत्यावस्थ दिसून आले. तसेच त्यांनी उलटी केल्याचेही निदर्शनास आले. विचारणा केली असता त्यांनी कीटकनाशक प्राशन केल्याचे मुलाला सांगितले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना सामान्य रुग्णालय, भंडारा येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी ६:४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तरीय तपासणीनंतर (PM) पार्थिव कुटुंबीियांच्या स्वाधीन करण्यात आले व त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अर्धा एकर शेतीवर चालायचा चरितार्थ
मृत राजकुमार बारसागडे यांच्या नावावर केवळ अर्धा एकर शेती असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत होता. पत्नी, मुलगा व मुलगी असे चार सदस्यांचे कुटुंब चालविताना खर्चाचा भार असह्य होत असल्याने त्यांनी शेती व संसारासाठी कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड करता येत नसल्याने ते अत्यंत चिंतेत होते. मागील सुमारे १५ दिवसांपासून ते तीव्र मानसिक तणावात असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. बचत गट व खाजगी कर्जाचा नेमका आकडा स्पष्ट होऊ शकला नाही. तान्ह्या पोळ्यासारख्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे बारसागडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *