शेताच्या कुंपणात अडकून बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
आमगाव तालुक्यातील बामणी येथील घटना शवविच्छेदनानंतर मृत्यूचे गूढ उकलणार
आमगाव/गोंदिया : आमगाव तालुका परिसरातील एका शेताच्या कुंपणात अडकून सुमारे १६ महिने वयाच्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवार, १३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हा निव्वळ अपघात आहे की शिकारीच्या उद्देशाने घडवून आणलेला घातपात, यादृष्टीने वनविभागाने कसून तपास सुरू केला आहे. जंगलालगत असलेल्या शेताभोवती लावलेल्या तारेच्या कुंपणात हा १६ महिन्यांचा बिबट्या अडकल्याचे समोर आले. कुंपणातून स्वतःची सुटका करण्याच्या प्रयत्नात तो गंभीर जखमी होऊन त्याचा तडफडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेमागे कुठला मानवी हस्तक्षेप आहे का, कुंपणात वीजप्रवाह सोडण्यात आला होता का किंवा बिबट्याला जाळ्यात अडकवण्याचा कट होता का, या सर्व बाबींची वनविभागाकडून कसून चौकशी केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत बिबट्याचे शवविच्छेदन (Post-mortem) केले जाणार असून, शवविच्छेदन अहवाल आणि सखोल तपासणीनंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.घातपाताची शक्यता नाकारता येत नाही : वनपरिक्षेत्र अधिकारी आकरेया गंभीर घटनेबाबत बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी आकरे यांनी स्पष्ट केले की, “बिबट्याच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. प्रकरणाची सर्व बाजूंनी सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जात आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि यात कोणी दोषी आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”शेतांचे कुंपण वन्यजीवांसाठी ठरतेय ‘मृत्यूचा सापळा’जंगलालगतच्या परिसरामध्ये रब्बी व खरीप हंगामात पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी विविध प्रकारची काटेरी कुंपणे तयार करतात. मात्र, वन्यप्राण्यांच्या नियमित भ्रमंतीच्या मार्गात ही कुंपणे त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे वारंवार समोर येत आहे. जंगलालगतच्या शेतकऱ्यांनी कुंपण उभारताना वन्यजीवांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

