LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

Water Scarcity : जिल्ह्यात 580 गावांमध्ये पाणीटंचाईची भीती

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके वाढले; कूलरचा वापर सुरू,
गोंदिया :
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचे चटके तीव्र होऊ लागले असून जिल्ह्यात उष्णतेचा प्रभाव जाणवू लागला आहे. तापमानात वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी कूलरचा वापरही सुरू झाला आहे. दरम्यान, आगामी उन्हाळ्यात जिल्ह्यातील सुमारे 580 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता ग्रामीण जलपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. ग्रामीण जलपुरवठा विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार तिरोडा, गोरेगाव, देवरी आणि गोंदिया या तालुक्यांतील 150 पेक्षा अधिक गावे Water Scarcity पाणीटंचाईने सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात. जिल्ह्यात सध्या 457 हँडपंप कायमस्वरूपी बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.
उन्हाळ्याची सुरुवात होताच अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे. सकाळपासूनच महिला व लहान मुले दूरवरच्या पाण्याच्या स्रोतांकडून पाणी आणण्यासाठी जाताना दिसत आहेत. Water Scarcity भूजल पातळी सातत्याने खालावत असल्याने मार्च ते जून या कालावधीत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाने व्यक्त केली आहे. वेळेत प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत तर पुढील काही महिन्यांत पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होऊ शकते, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प तसेच अनेक तलाव आणि जलस्रोत उपलब्ध असतानाही गेल्या काही वर्षांतील कमी पाऊस आणि जलसंधारणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यात काही तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात; मात्र दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव असल्याने समस्या कायम राहते. दरम्यान, या जलसंकटाचा परिणाम आता शहरी भागावरही होण्याची शक्यता आहे. Water Scarcity शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातही पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुजारीटोला धरणातून पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे.
………………………………………….
 शाळांचा वेळ सकाळच्या पाळीत करण्याची मागणी
गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे. वातावरणातील आर्द्रता कमी झाल्याने तापमान झपाट्याने वाढत आहे. 4 मार्च रोजी जिल्ह्यात कमाल तापमान 35.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांकडून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळच्या पाळीत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. साधारणपणे दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळांचा वेळ सकाळी करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र यंदा मार्च महिन्याचे पाच दिवस उलटूनही यासंदर्भात कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. तप्त उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने विद्यार्थ्यांना पुरेसे पाणीही मिळत नाही. काही शाळांमध्ये पंख्यांचीही सोय नसल्याने वर्गखोल्यांमध्ये उकाडा असह्य होतो. तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचण्याची शक्यता असल्याने दुपारच्या पाळीत शाळा सुरू ठेवणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद तसेच माध्यमिक शाळांमध्ये दूरवरच्या गावांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. काही विद्यार्थ्यांना 1 ते 3 किलोमीटरपर्यंत पायी किंवा सायकलने प्रवास करून शाळेत यावे लागते. सकाळी 9 वाजल्यानंतरच उन्हाचे तीव्र चटके बसू लागतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *