LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

राष्ट्रीय महामार्गावरील ९ बळींचा जबाबदार कोण? पेट्रोल पंप, पिकअप अन् सीमा तपासणी संशयाच्या घेऱ्यात!

पिंपळगाव सडकजवळ भीषण अपघात प्रकरण
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील आरटीओ व पोलीस तपासणीवर गंभीर प्रश्नचिन्ह
भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर पिंपळगाव सडकजवळ शुक्रवारी घडलेल्या भीषण अपघातात ९ प्रवाशांचा नाहक बळी गेल्यानंतर आता महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या हृदयद्रावक अपघाताला जबाबदार धरून पोलिसांनी द्वारका पेट्रोल पंप चालकासह आयशर आणि पिकअप वाहनाच्या चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंप संचालक, नियमांचे उल्लंघन करणारा पिकअप चालक आणि अंतरराज्यीय सीमा तपासणी नाका या तिन्हींची भूमिका आता चौकशीच्या घेऱ्यात आली आहे.
तीन अनुत्तरित प्रश्न; ज्यांची उत्तरे मिळणे गरजेचे!
१. पेट्रोल पंपाचा निष्काळजीपणा: द्वारका पेट्रोल पंपावरून आयशर वाहन महामार्गावर प्रवेश करत असताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन केले गेले होते का?
२. ओव्हरलोड वाहतूक: क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच २१ प्रवाशांना पिकअपमध्ये बसवून भरधाव वेगाने वाहन चालवण्यास जबाबदार कोण?
३. सीमेवरील भोंगळ कारभार: छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील तपासणी नाक्यावर या ओव्हरलोड वाहनाची तपासणी का झाली नाही?
सीमेवरील तपासणीवर मोठे प्रश्नचिन्ह
सर्वात मोठा प्रश्न छत्तीसगड-महाराष्ट्र आंतरराज्यीय सीमेवरील यंत्रणेवर उपस्थित होत आहे. सीमेवरून महाराष्ट्रात प्रवेश करताना वाहनाची तपासणी झाली होती का? झाली असल्यास २१ प्रवाशांनी खच्चून भरलेले वाहन सीमा पार करून पुढे जाईपर्यंत तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
महामार्गावरील पेट्रोल पंपांवरून थेट मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या भीषण अपघातात ९ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर आता जिल्ह्यातील सर्व महामार्गांवरील पेट्रोल पंपांच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करावे, ओव्हरलोड आणि भरधाव वाहनांवर कडक कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *