वृद्धेच्या हत्येला १२ दिवस उलटले तरी आरोपी फरार
आरोपीची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी जाहीर केले ५० हजार रुपयांचे बक्षीस
डुग्गीपार पोलिसांचे आवाहन
सड़क अर्जुनी (गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव राका येथील घरी एकटीच असलेल्या ८१ वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करून अंगावरील दागिने चोरून नेल्याची घटना २ सप्टेंबर रोजी घडली होती. या घटनेला १२ दिवसांचा कालावधी लोटूनही या प्रकरणातील आरोपींचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे डुग्गीपार पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पळसगाव राका येथील ८१ वर्षीय कुसुम चैत्राम कापगते ही वृद्ध महिला मुलगा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असल्याने घरी एकटीच राहत होती. अज्ञात इसमाने तिची हत्या करून अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली.
घटनास्थळावर श्वान पथक, फॉरेन्सिक चमू आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी भेट देऊन तपासासाठी आवश्यक नमुने गोळा केले. सुरुवातीला हत्या व चोरी प्रकरणातील अज्ञात इसम ओळखीचा व जवळचाच असावा असा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचणे सहज शक्य होईल असे वाटत होते. पोलिसांनी कसून चौकशी सुरू करत अनेक संशयितांची चौकशी केली, परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा होत चालला असून अद्यापही मुख्य आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत केल्या आहेत.
पळसगाव राका येथील वृद्धेची हत्या करणाऱ्या आरोपींची माहिती देणाऱ्याची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार असून, त्याला पोलीस विभागाकडून ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शेख आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रेवचंद सिंगनजुडे हे करत आहेत.

