LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

कुसुमबाई कापगते हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना तात्काळ बेड्या ठोका

कोहळी समाजाचे निवेदन, SIT स्थापन करण्याची मागणी!

डुग्गीपार पोलीस ठाण्यावर धडकला समाजबांधवांचा मोर्चा

सडक अर्जुनी (गोंदिया) : पळसगाव येथील सौ. कुसुमबाई चैतराम कापगते यांच्या निर्घृण व अमानुष हत्या प्रकरणाला तब्बल ११ दिवस उलटूनही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश न आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. या प्रकरणातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना फासावर लटकवावे आणि तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करावी, या आक्रमक मागणीसाठी कोहळी समाजबांधवांच्या वतीने डुग्गीपार पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.गेल्या २ सप्टेंबर २०२६ रोजी घडलेल्या या थरारक हत्याकांडाने संपूर्ण सडक अर्जुनी तालुका हादरून गेला होता. मात्र, घटनेनंतर एवढा मोठा कालावधी उलटूनही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस धागादोरा लागलेला नाही. पोलिसांच्या संथ कारभारामुळे पीडित कापगते कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण कोहळी समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर समाजबांधवांनी संघटित होत पोलीस प्रशासनाला तपासाची गती वाढवण्याचा इशारा दिला आहे. निवेदनातून समाजबांधवांनी स्पष्ट केले की, या हत्येमागील मुख्य कारण, संभाव्य कटकारस्थान आणि पडद्यामागील सूत्रधारांचा निष्पक्ष व सखोल तपास करण्यात यावा. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचे मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर) आणि इतर फॉरेन्सिक पुराव्यांची कसून छाननी करावी. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील व गंभीर असल्याने स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त विशेष तपास पथक (SIT) गठीत करून तपास वरिष्ठ पातळीवरून व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन डुग्गीपार ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी स्वीकारले. याप्रसंगी कोहळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, मार्गदर्शक गंगाधर परशुरामकर, उपाध्यक्ष अमोल पाटील मुंगमोडे, किशोर डोंगरवार, चामेश्वर गहाणे, डॉ. गजानन डोंगरवार, सरपंच भारती लोथे, सरपंच प्रवीण गहाणे, पराग कापगते, चोपराम गोबाडे, प्रकाश काशीवार, मनीराम परशुरामकर, छगन परशुरामकर, विजय लंजे, भीमसेन पर्वते यांच्यासह परिसरातील शेकडो समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.जोपर्यंत आरोपींना फाशी नाही, तोपर्यंत लढा थांबणार नाही!”सौ. कुसुमबाई कापगते यांच्या निष्पाप कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण संकटात संपूर्ण कोहळी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तपासात चालढकल खपवून घेतली जाणार नाही. मारेकऱ्यांचा छडा लावून त्यांना गजाआड करेपर्यंत आणि पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल,” असा स्पष्ट इशारा शिष्टमंडळाने दिला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *