लाचखोर ‘आरएफओ’सह तिघे एसीबीच्या जाळ्यात!
● सागवान तस्करी प्रकरणात फर्निचर परवाना वाचवण्यासाठी मागितली ३ लाखांची लाच
● ५० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना दलालासह वनरक्षकही जेरबंद; मुलचेरा तालुक्यातील पेड्डीगुडम येथील खळबळजनक कारवाई
मुलचेरा (गडचिरोली) : सागवान तस्करीच्या गुन्ह्यात फर्निचर विक्रीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे न पाठवण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा (आरएफओ) बुरखा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) फाडला आहे. लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताना लाचखोर आरएफओसह एक वनरक्षक आणि त्यांच्या दलालाला एसीबीच्या पथकाने शुक्रवारी (दि. १९) सकाळी रंगेहात अटक केली. या धडक कारवाईमुळे वनविभागातील लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. श्रीनिवास कटकू (वय ५२, वनपरिक्षेत्र अधिकारी), नितीश मडावी (वय ३७, वनरक्षक) आणि प्रदीप मंडल (वय ५०, खाजगी दलाल) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुलचेरा तालुक्यातील पेड्डीगुडम वनविभागाच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी अवैध सागवान लाकूड बाळगल्याप्रकरणी तक्रारदारावर वनगुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामुळे तक्रारदाराचा फर्निचर विक्रीचा व्यवसाय आणि परवाना धोक्यात आला होता. हा परवाना रद्द होऊ नये आणि तसा कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नये, यासाठी वनरक्षक नितीश मडावी याने १७ जून रोजी आरएफओ श्रीनिवास कटकू याच्या सांगण्यावरून तक्रारदाराला लाचेची मागणी केली. त्यानंतर १८ जून रोजी स्वतः आरएफओ श्रीनिवास कटकू याने ३ लाख रुपयांची लाच निश्चित करून, त्यातील पहिला हप्ता ५० हजार रुपये त्याचा खाजगी दलाल प्रदीप मंडल याच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले.
एसीबीचा गणेशपूर-मुलचेरा रोडवर अचूक सापळा तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करून शुक्रवारी सकाळी गणेशपूर ते मुलचेरा मार्गावर सापळा रचला. ठरल्यानुसार, खाजगी दलाल प्रदीप मंडल याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात दबोचले. दलालाला ताब्यात घेताच, लाचेची मागणी करणारे मुख्य सूत्रधार आरएफओ श्रीनिवास कटकू आणि वनरक्षक नितीश मडावी या दोघांनाही पथकाने तत्परतेने बेड्या ठोकल्या. एकाच वेळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह तिघांना अटक झाल्याने गडचिरोली वनवृत्तात मोठी खळबळ उडाली असून, एसीबीच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे.


