LatestNewsगोंदियाविदर्भ

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले; पत्नीचा जागीच मृत्यू

पती गंभीरदेवरी तहसील कार्यालयासमोर घडला अपघात

पोळ्याच्या उत्साहावर काळाचा क्रूर घाला!

देवरी (नवचैतन्य गोंदिया): सर्जा-राजाच्या पोळा सणाचा उत्साह साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुण दाम्पत्याच्या संसारावर काळाने अचानक घाला घातला. देवरी शहरातील तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी भरधाव ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. ज्योती रुपेश दर्रो (वय २४ वर्षे, रा. दर्रोटोला/भर्रेगाव, ता. देवरी) असे मृत महिलेचे नाव आहे, तर रुपेश कन्हैयालाल दर्रो (वय २९ वर्षे) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.पेट्रोल भरण्यासाठी जात असताना धडकमिळालेल्या माहितीनुसार, पोळा सणानिमित्त रुपेश दर्रो हे पत्नी ज्योतीसह एमएच ३५ एवाय १४०९ (MH 35 AY 1409) क्रमांकाच्या दुचाकीने बाहेरगावी जाण्यासाठी निघाले होते. प्रवासापूर्वी वाहनात पेट्रोल भरण्यासाठी ते तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, समोरून आलेल्या सीजी ०७ बीए ३०६७ (CG 07 BA 3067) क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे ज्योती यांचा घटनास्थळावरच तडफडून मृत्यू झाला. तर रुपेश हे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाले. सणाचा आनंद साजरा करण्याच्या बेतात असलेल्या या निष्पाप दाम्पत्यावर क्षणार्धात काळाने झडप घातल्याने प्रत्यक्षदर्शींचेही डोळे पाणावले.घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी गंभीर जखमी रुपेश दर्रो यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा; देवरी पोलिसांकडून तपास सुरूया प्रकरणी देवरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून धडक देणारा ट्रक ताब्यात घेतला आहे. अपघात नेमका कोणत्या कारणाने घडला आणि वाहनाचा वेग किती होता, या दृष्टीने पोलीस पुढील कायदेशीर तपास करीत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *