LatestNewsगोंदियाविदर्भ

तिरोडाजवळ मालवाहू आणि कारचा भीषण अपघात; एक जण गंभीर, ३ जखमी

सरांडी गावाजवळील घटना : गोंदिया-तुमसर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
तिरोडा / गोंदिया (प्रतिनिधी) :
गोंदिया-तुमसर मार्गावरील तिरोडा तालुक्यातील सरांडी गावाजवळ दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका सुसाट वेगाने जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचा पुढील भागाचा पार चक्काचूर झाला असून कारमधील एक प्रवासी अत्यंत गंभीर जखमी झाला आहे, तर इतर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ८ जून रोजी दुपारच्या सुमारास गोंदिया-तुमसर मुख्य मार्गावरून स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एम.एच.४३ / बी.जी. ९०४८) अतिशय वेगाने जात होती. कार सरांडी गावाजवळ आली असता, कार चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण सुटलेली ही सुसाट कार थेट विरुद्ध दिशेने आपल्या मार्गाने येणाऱ्या मालवाहू वाहनावर (क्रमांक एम.एच.३५ / ए.जे. २९८३) जाऊन आदळली. धडक इतकी भीषण आणि भयानक होती की, त्याचा मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या जखमींना नागरिकांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *