LatestNewsगोंदियाविदर्भ

बैलजोडीवर झळकले ‘धानाचा बोनस द्या’चे बॅनर! पांजरा येथे शेतकऱ्यांचा अनोखा पोळा;

सरकारविरोधात तीव्र नाराजीपारंपरिक सजावटीऐवजी मागण्यांचे फलक लावून वेधले लक्ष

गोंदिया (नवचैतन्य): संपूर्ण महाराष्ट्रात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा होत असताना, गोंदिया तालुक्यातील पांजरा येथील शेतकऱ्यांनी मात्र आगळावेगळा पोळा साजरा करत शासनाचे लक्ष वेधून घेतले. पोळ्याच्या सणासाठी बैलजोडीला नवी झूल आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्याऐवजी शेतकऱ्यांनी थेट बैलांच्या अंगावर बॅनर लावून प्रलंबित धानाच्या बोनसची आग्रही मागणी केली.

पांजरा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाच्या पाठीवर ‘सरकारने दिलेला शब्द पाळा, धानाचा बोनस द्या’ असे स्पष्ट संदेश लिहिलेले फलक लावून गावातून मिरवणूक काढली. या अनोख्या आंदोलनाची संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत शासनाकडून केवळ घोषणा आणि आश्वासनांची खैरात केली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष वर्ष उलटून गेले तरी खात्यात बोनस जमा झालेला नाही. रासायनिक खते, बियाणे, मजुरीचा वाढता खर्च आणि महागाईच्या चक्रव्यूहात अडकलेला बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सणाचा आनंद बाजूला ठेवून शेतकऱ्यांनी आपल्या मुक्या जनावरांच्या साथीने शासनाच्या अनास्थेविरोधात रोष व्यक्त केला आहे.पारंपरिक सजावटीला फाटा, मागण्यांचे फलकपोळा सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना रंगरंगोटी करून, बाशिंग आणि नवी झूल घालून सजवतात. मात्र पांजरा येथील धान उत्पादकांनी यंदा पारंपरिक सजावटीला फाटा दिला. ‘शब्द पाळा—बोनस द्या’ असा थेट इशारा देणारे फलक बैलांवर बांधून त्यांनी शासनाला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.बोनसच्या घोषणेकडे बळीराजाचे लक्षशेतीचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना हमीभावाव्यतिरिक्त मिळणारा बोनस हाच शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतो. पांजरा गावातील शेतकऱ्यांच्या या अनोख्या आंदोलनानंतर तरी शासन जागे होणार का आणि थकीत धानाचा बोनस तातडीने जाहीर करणार का, याकडे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील बळीराजाचे डोळे लागले आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *