LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

ऑनलाईनच्या तांत्रिक कचाट्यात विकासकामे रखडली

देवरी तालुक्यात ‘रोहयो’चा बोजवारा : मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

देवरी : तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (रोहयो) अंमलबजावणी पूर्णपणे कोलमडली असून, प्रशासकीय दिरंगाईचा मोठा फटका हजारो मजूर आणि लाभार्थ्यांना बसत आहे. ऑनलाईन प्रणालीच्या नावाखाली तालुक्यातील सिंचन विहिरी, पांदण रस्ते आणि अन्य महत्त्वाची विकासकामे तांत्रिक कारणास्तव रखडली असून, मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात संबंधित यंत्रणेशी विचारणा केली असता ‘साइट ऑनलाईन होत नाही’ असे कारण पुढे करून संबंधित अभियंत्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असताना मजुरांच्या हाताला काम मिळणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात चित्र उलटे दिसत आहे.

“प्रशासन तांत्रिक बिघाडाचे कारण सांगून आपली जबाबदारी झटकत आहे. मजुरांच्या हाताला काम न मिळाल्यास आणि शेतकऱ्यांच्या विहिरींचे नुकसान झाल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल. आम्ही येत्या ८ दिवसात आंदोलनाच्या तयारीत आहोत.”

— रणजीत कासम, सदस्य, पंचायत समिती, देवरी.

शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना केवळ कागदावरच अडकून पडल्या असून, तालुका स्तरावरील संबंधित विभागाचे अभियंते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. लाभार्थी कामाबाबत पाठपुरावा करण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले असता, सर्व्हर डाऊन आहे, काम ऑनलाईन दिसत नाही, किंवा वरच्या स्तरावरून तांत्रिक अडचण आहे, अशी अनेक कारणे सांगून त्यांना माघारी पाठवले जात आहे. एवढे दिवस लोटूनही तालुक्यात ‘ऑनलाईन’चा अडथळा दूर का झाला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.या तांत्रिक गोंधळामुळे अनेक विकासकामे खोळंबली असून विशेषतः विहिरींची कामे पूर्णपणे ठप्प आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींची कामे अर्धवट अवस्थेत असून पावसाळा तोंडावर असताना ही कामे पूर्ण न झाल्यास झालेल्या खोदकामाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच, शेतात जाण्यासाठी तयार करण्यात येणारे पांदण रस्ते मंजुरीअभावी किंवा मोजमाप न झाल्याने रखडले आहेत. या कामाअभावी मजुरांना रोजगारासाठी इतरत्र स्थलांतर करावे लागत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे.प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेविरोधात आता लोकप्रतिनिधींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जर येत्या आठवडाभरात रखडलेली ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून कामांना गती दिली नाही, तर तहसील कार्यालय किंवा पंचायत समितीवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा तालुका सेवादल काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रणजीत कासम, प्रल्हाद सलामे (पं.स. सदस्य), भारतीताई सलामे (पं.स. सदस्य) आणि अनुसयाताई सलामे (पं.स. सदस्य) यांनी दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *