रेल्वे भूसंपादनाच्या अल्प मोबदल्याविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
अडीच तास गोंदिया-बालाघाट महामार्ग रोखला
गोंदिया : गुदमा-प्रताप बाग या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनींना नाममात्र मोबदला देणे आणि प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेविरोधात आज ‘किसान जमीन बचाओ संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गोंदिया-बालाघाट राज्यमार्गावर जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. कटंगी नाका येथे दुपारी १२ वाजता महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सुरू झालेले हे आंदोलन तब्बल अडीच तास, म्हणजेच दुपारी २:३० वाजेपर्यंत धडक सुरू होते.
या आंदोलनात कटंगी कला, नागरा, हलबी टोला, सावरी, गर्रा, गोंदिया खुर्द, पोवारी टोला, दतोरा, खमारी व चुलाद यासह बाधित १२ गावांतील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी काळ्या फिती बांधून व काळे रुमाल फडकवत प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. रणरणत्या उन्हात महामार्गावर ठिय्या मांडत शेतकऱ्यांनी भजन गाऊन शांततापूर्ण मार्गाने आपला रोष व्यक्त केला. आंदोलनामुळे गोंदिया-बालाघाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ पावले उचलत लहान वाहने नागरामार्गे व बालाघाट टी-पॉईंटवरून पर्यायी मार्गाने वळवली; मात्र अवजड वाहने महामार्गावरच अडकून पडल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दुपारी २:३० वाजता उपविभागीय अधिकारी (SDO), तहसीलदार आणि रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेत शेतकऱ्यांशी थेट चर्चा केली व त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, “मागण्या मान्य न झाल्यास हा लढा आणि आंदोलन अधिक तीव्र व आक्रमक केले जाईल,” असा कडक इशारा यावेळी शेतकरी नेत्यांनी दिला.
या आंदोलनात संघर्ष समितीचे अखिलेश सेठ, प्रा. अमित बुद्धे, राजेश नागरीकर, नंदुभाऊ बिसेन, कार्तिक चव्हाण, मोहिनी वराडे, गोल्डी गावंडे, गोपाळ चुटे, श्याम बुद्धे, छोटू बुद्धे, सुप्रित बैस, रसिक पटेल, गुड्डू मिश्रा, पुजा सेठ, हंसराज लिल्हारे, नानु चिखलोंढे, विष्णु नागरीकर, सचिन रहागंडाले यांच्यासह शेकडो बाधित शेतकरी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


