गोंदियात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तरुणावर पोलिसांची धाड; २०.७ ग्रॅम ‘एम.डी.’ क्रिस्टल पावडरसह आरोपी गजाआड!
शास्त्री वॉर्डातील पंचायत समिती कॉलनीत शहर पोलिसांची धडक कारवाई; ६२,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया (८ सप्टेंबर): शहरात अमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या तस्करांविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शास्त्री वॉर्डातील पंचायत समिती कॉलनी परिसरात घरावर छापा टाकून पोलिसांनी २०.७ ग्रॅम वजनाची मेथॉडान (एम.डी.) क्रिस्टल पावडर जप्त केली असून एका २६ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे ६२ हजार १०० रुपये आहे. राहुल हेमराज मंडीया (वय २६ वर्षे, रा. पंचायत समिती कॉलनी, शास्त्री वॉर्ड, गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी शहर पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत होते. यादरम्यान राहुल मंडीया हा आपल्या घरात अमली पदार्थ (एम.डी. पावडर) बाळगून त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक, दोन शासकीय पंच, छायाचित्रकार आणि वजन काट्यासह तातडीने शास्त्री वॉर्ड, संजयनगर गोविंदपूर परिसरातील संशयिताच्या घराकडे रवाना झाले.
पोलिसांनी घरात जाऊन राहुल मंडीयाच्या उपस्थितीत घराची कसून झडती घेतली असता एका पारदर्शक प्लास्टिक पिशवीत मळकट रंगाचा संशयास्पद पावडर आढळून आला. पंचांसमक्ष विचारपूस केली असता तो अमली पदार्थ ‘एम.डी. क्रिस्टल पावडर’ असल्याची कबुली त्याने दिली. इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन केले असता त्याचे वजन २०.७ ग्रॅम भरले. ३ हजार रुपये प्रति ग्रॅम दराने पोलिसांनी ६२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी राहुल मंडीयाविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. ७२७/२०२६ अन्वये अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८ (क), २२ (ब) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहर पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय तुपे पुढील तपास करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, सपोनि वैभव गेडाम, सपोनि संजय तुपे, डी.बी. पथकाचे सफौ कवलपालसिंग भाटीया, पोहवा सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, पोशि दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे व अजय बोपचे यांनी केली आहे.

