LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदियाच्या समृद्ध जैवविविधतेत मानाचा तुरा! मुर्दोलीच्या जंगलात प्रथमच आढळला दुर्मीळ ‘युरोपियन रोलर’ पक्षी

वनरक्षक आरती फुले यांनी पक्षीनिरीक्षणादरम्यान केली नोंद
गोंदिया : तलाव, समृद्ध वने आणि वन्यजीवांचे माहेरघर असलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या जैवविविधतेत आणखी एका अत्यंत दुर्मीळ आणि देखण्या पाहुण्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. गोरेगाव तालुक्यातील मुर्दोली वनपरिक्षेत्रातील जंगलात ‘युरोपियन रोलर’ (European Roller) हा दुर्मीळ स्थलांतरित पक्षी पहिल्यांदाच आढळून आला आहे. वनरक्षक आरती फुले यांनी पक्षीनिरीक्षणादरम्यान या पक्ष्याची छायाचित्रासह अचूक नोंद घेतली आहे. गोंदिया जिल्ह्यात युरोपियन रोलर पक्षी दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्ह्यातील निसर्गअभ्यासक आणि पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अत्यंत आकर्षक रंगसंगती असलेला ‘युरोपियन रोलर’ हा स्थलांतरित पक्षी असून तो महाराष्ट्रात क्वचितच आढळतो. स्थलांतराच्या मार्गावर असताना हा पक्षी महाराष्ट्रातील मोजक्या भागांमध्ये विसावा घेताना दिसून येतो. यापूर्वी विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ तसेच सोलापूर परिसरात या पक्ष्याच्या काही तुरळक नोंदी झाल्या होत्या. मात्र गोंदिया जिल्ह्यातील घनदाट जंगल, मुबलक जलस्रोत आणि अनुकूल नैसर्गिक अधिवासामुळे या देखण्या पाहुण्याने येथे हजेरी लावल्याचे स्पष्ट झाले आहे. वनरक्षक आरती फुले या नियमित गस्तीदरम्यान पक्षीनिरीक्षण करत असताना त्यांच्या तीक्ष्ण नजरेस हा अनोखा पक्षी पडला. त्यांनी तत्काळ त्याची छायाचित्रे टिपून वरिष्ठ अभ्यासकांच्या मदतीने ओळख पटवली असता, तो युरोपियन रोलर असल्याचे निश्चित झाले.
महाराष्ट्रात यापूर्वी मोजक्याच ठिकाणी नोंद!
महाराष्ट्रातील ‘ई-बर्ड’ (eBird) आणि इतर अधिकृत नोंदीनुसार युरोपियन रोलर यापूर्वी मोजक्याच भागात दिसला आहे:
नागपूर: अंबाझरी तलाव परिसरात ५ जून २००५ रोजी पहिली नोंद; त्यानंतर हिंगणा रोडवरील देगमा जंगलात २०१४ व २०१५ मध्ये दर्शन.
वर्धा: पिंपळखुटा (NH-६४७) परिसरात ६ ऑक्टोबर २०२३ रोजी नोंद.
सोलापूर व यवतमाळ: सोलापूरच्या नन्नज माळढोक अभयारण्य परिसरात आणि यवतमाळच्या पक्षी यादीत जुनी नोंद.
पर्यावरण अभ्यासकांसाठी मोठी उपलब्धी
हा पक्षी महाराष्ट्रात नियमितपणे दिसत नसल्याने मुर्दोली जंगलातील ही नोंद जैवविविधतेच्या आणि अन्नसाखळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. गोंदिया जिल्ह्याच्या जंगलात नियमित व शास्त्रीय पद्धतीने पक्षीनिरीक्षण केल्यास आणखी दुर्मीळ स्थलांतरित प्रजाती समोर येण्याची शक्यता पक्षीअभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *