१३ वर्षांपासून रखडलेल्या रेलटोली सभागृहाला मिळणार गती?
पालकमंत्री नाईक व खासदार जैन यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; दिरंगाईबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत
गोंदिया : रेलटोली परिसरातील गेल्या तब्बल १३ वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत पडून असलेल्या बहुप्रतिक्षित सभागृहाच्या (ऑडिटोरियम) निर्मितीबाबत आता शहरवासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. गोंदिया दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक आणि खासदार राजेंद्र जैन यांनी या अर्धवट इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला अखेर प्रशासकीय गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
रेलटोली भागातील हे सभागृह मागील एका तपाहून अधिक काळापासून निधीअभावी आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे धूळ खात पडून आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही ही सार्वजनिक सुविधा अपूर्ण राहिल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दौऱ्यादरम्यान पालकमंत्री आणि खासदारांनी इमारतीचे शिल्लक राहिलेले बांधकाम, सद्यस्थिती आणि प्रलंबित कामांविषयी सविस्तर माहिती घेतली. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय पावले उचलण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. इतकी वर्षे हे काम का रखडले, याचे कारण शोधून संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या पाहणीप्रसंगी केतन तुरकर, सुमित गुप्ता, अरविंद चौरसिया, जॉली पटेल, पीनल पटेल, अमित गुप्ता, रोहित करोट, संजीव राय, संजीव गुप्ता, अंकित यादव, लक्की पवार यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक चळवळीला मिळणार हक्काचे व्यासपीठ
शहराच्या मध्यवर्ती भागात हक्काचे नाट्यगृह किंवा सुसज्ज सभागृह नसल्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अडचणी निर्माण होत आहेत. आता राजकीय व प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यास, शहराचा १३ वर्षांपासूनचा वनवास संपेल आणि गोंदियाकरांना एक भव्य व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

