LatestNewsगोंदियागोंदिया- भंडारामहाराष्ट्र

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उन्हाळी शिबिरातून करिअरच्या नव्या संधी खुल्या : जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

विद्यार्थ्यांनी एआय ते पारंपारिक कलांचे उन्हाळी शिबिरात घेतले प्रशिक्षण
गोंदिया :
देवरी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराच्या समारोप कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अशा शिबिरांमुळे करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. या शिबिरात विद्यार्थ्यांना महिनाभर विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गोंडी चित्रकला, मेहंदी, क्ले आर्ट, बॉटल आर्ट, रांगोळी, पेंटिंग, बांबू हस्तकला तसेच एआय आणि रोबोटिक्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले. हे शिबिर बोरगाव/बाजार येथील शासकीय आश्रम शाळेत पार पडले.
समारोप कार्यक्रम पालकांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत, राज्य गीत आणि गोंडी स्वागत गीताने झाली. जिल्हाधिकारी म्हणाले की, योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास आदिवासी भागातील विद्यार्थीही मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात. या शिबिरातून विद्यार्थ्यांना पारंपरिक संस्कृतीसोबत आधुनिक कौशल्ये शिकण्याची संधी मिळाली, ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही कौशल्ये विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात करिअर किंवा छंद म्हणून उपयोगी पडतील, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी केले. शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून आश्रम शाळांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे त्यांनी सांगितले. समारोप सोहळ्यात विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना वंदन करणारे नृत्य, स्तवन, भजन, आदिवासी नृत्य तसेच वाद्य सादरीकरण केले. या सादरीकरणांनी उपस्थित पालक भारावून गेले. विशेष आकर्षण म्हणून एअर शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या प्रतिकृतींचे स्टंट सादर करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी मल्लखांबचे कौशल्यपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *