गडचिरोलीतील सिरोंचा-अहेरी परिसर ठरतोय भूकंपाचा केंद्रबिंदू! गोदावरी खोऱ्यातील भूगर्भीय हालचालींनी चिंता वाढली
२०२१ पासून सतत सौम्य धक्के; ३ सप्टेंबरला पुन्हा ३.६ रिश्टर तीव्रतेची नोंद, प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज
गडचिरोली : निसर्गसंपन्न आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जाणवणाऱ्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे भूगर्भातील हालचालींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः सिरोंचा आणि अहेरी तालुक्यांचा परिसर आता भूकंपाच्या हालचालींचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे समोर आले आहे. नुकताच ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात ३.६ रिश्टर तीव्रतेचा सौम्य भूकंप जाणवल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही वर्षांतील भूकंपाचा इतिहास
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी दक्षिण गडचिरोलीतील सिरोंचा परिसरात ४.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता, ज्याची खोली २० किलोमीटर होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२२ रोजी पुन्हा ३.८ रिश्टर तीव्रतेचा धक्का बसला. या भूकंपाचे धक्के सिरोंचा शहर, मेदाराम, झिंगानूरसह अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, उमानूर, मरपल्ली, जोहनगुडा व तिमरम भागातही जाणवले होते.
तसेच ४ डिसेंबर २०२४ रोजी तेलंगणातील मुलुगू परिसरात झालेल्या ५.३ रिश्टर तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचे जोरदार पडसाद या सीमावर्ती भागात उमटले होते. भूगर्भशास्त्रीय अभ्यासानुसार या हालचालींचा थेट संबंध गोदावरी खोऱ्याच्या भूगर्भीय रचनेशी जोडला गेला असून, गडचिरोली-तेलंगणा सीमाभागातील भूगर्भीय हालचालींचे वैज्ञानिक निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
भूकंपप्रवण भागात आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज
भूकंपाच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे केवळ भीती बाळगण्यापेक्षा प्रशासनाने पूर्वतयारी ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भूकंपाची नेमकी वेळ आणि तीव्रता आधीच सांगणे विज्ञानाला अद्याप शक्य झालेले नाही.
त्यामुळे सिरोंचा, अहेरी आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना भूकंपाच्या वेळी काय करावे, सुरक्षित निवारक ठिकाणे कोणती आणि अफवांपासून कसे दूर राहावे, याबाबत सातत्याने जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यासोबतच या परिसराचा सखोल शास्त्रीय भूगर्भीय अभ्यास करावा, अशी मागणी होत आहे.

