कुटुंबाचा एकमेव आधार हरपल्याने भांबोरा शोकमग्न, वाघिणीने घेतला बळी
उपवनसंरक्षक के.आर. अर्जुना यांच्या हस्ते मृत शेतकरी कुटुंबाला पाच लाखांचा धनादेश सुपुर्द
मोर्शी (अमरावती) : ‘घरचा कर्ता पुरुष सकाळी हसतमुखाने शेतात गेला, पण दुपारी परतली ती केवळ त्यांची छिन्नविछिन्न काया… आता आम्ही कोणाच्या आधाराने जगायचे?’ हा टाहो आहे वाघिणीच्या हल्ल्याला बळी ठरलेले भांबोरा येथील शेतकरी चरणदास वासुदेव इखे (वय ५५) यांच्या पत्नीचा. गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी वर्धा आणि चारगड नदीच्या संगम क्षेत्रातील शेतशिवारात निसर्गाच्या या क्रूर रूपाने एका सुखी कुटुंबाची राखरांगोळी केली. चरणदास यांच्या निधनामुळे इखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण भांबोरा गावातील घराघरांमध्ये आज चूल पेटली नाही. गावकऱ्यांसह आप्तस्वकीय या वेदनेने ढसाढसा रडत असून, परिसरात कमालीची शोककळा पसरली आहे.
चरणदास यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे पतीसाठी डबा घेऊन शेतात गेल्या होत्या. मात्र, शेतात पाऊल ठेवताच नेहमीप्रमाणे साद घालणारे पती कुठेच दिसले नाहीत. मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यांनी गावकऱ्यांना गोळा करून जंगलाच्या सीमावर्ती भागात शोध सुरू केला. काही अंतरावर जाताच समोर जे दृश्य होते, त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
संपूर्ण गाव शोकाकुल; भीतीचे सावट कायम
चरणदास इखे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. कुटुंबाचा एकमेव पालनकर्ता अचानक हिरावून गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भांबोरा व परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये केवळ शोक नाही, तर स्वतःच्या सुरक्षेविषयी तीव्र भीती आणि वन विभागाच्या धिसाळ कारभाराबद्दल प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडून सांत्वन
माजी खासदार नवनीत राणा यांनी तातडीने भांबोरा गावाला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून इखे कुटुंबाचे सांत्वन केले. चरणदास यांच्या पत्नी व मुलांना धीर दिला आणि ‘या कठीण प्रसंगात संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठीशी उभा आहे,’ अशी ग्वाही दिली.
वरिष्ठ पातळीवर सूचना
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, डीसीएफ के. आर. अर्जुना यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. नरभक्षक वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करण्याची सूचना त्यांनी केली.


