भंडारा एसीबीची धडाकेबाज कारवाई; ५ हजारांची लाच घेताना वनरक्षक रंगेहाथ जाळ्यात!
पोल्ट्री फार्म चालकावर कारवाई न करण्यासाठी मागितली होती लाच; साकोली पोलिसांत गुन्हा दाखल
भंडारा : पोल्ट्री फार्म संचालक आणि त्यांच्या मजुरांवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचखोर वनरक्षकाविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्तरंजन राधेश्याम कोरे असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या आरोपी वनरक्षकाचे नाव आहे.
साकोली येथील शिवाजी वार्ड रहिवासी तक्रारदार सुशील गोपाल रामटेके (३५) यांनी २८ ऑगस्ट रोजी आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या मजुरांना मोहघाटा जंगल परिसरात बांबू कापण्यासाठी पाठवले होते. दरम्यान, आरोपी वनरक्षक चित्तरंजन कोरे याने मजुरांना बांबू कापताना पकडले. वनरक्षकाने जप्तीनामा बनवून आणि फोटो काढून तक्रारदाराला घटनास्थळी बोलावून घेतले. मजुरांवर आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई टाळायची असल्यास ५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली.
लाचेच्या या मागणीमुळे त्रस्त होऊन तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), भंडारा येथे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने ३१ ऑगस्ट रोजी तक्रारीची पडताळणी केली असता, वनरक्षक ५ हजार रुपयांची लाच मागत असल्याचे व ती स्वीकारण्यास तयार असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीच्या पथकाने १ सप्टेंबर रोजी सापळा रचून आरोपी वनरक्षक चित्तरंजन कोरे याला आपल्या पदाचा दुरुपयोग करून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
साकोली पोलिसांत गुन्हा दाखल
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडाऱ्याचे पोलीस उपअधीक्षक प्रवीणकुमार ज्ञानदेव पाटील यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितेश देशमुख करत आहेत.

