महापालिका सभागृहात हिंदी राष्ट्रभाषा की मातृभाषा? नगरसेवकांची एकमेकांवर चिखलफेक; भाषिक वादाने वातावरण तापले!
नागपूर मनपाच्या सभेत हिंदी-मराठी वादावरून जोरदार गदारोळ!
नागपूर (विशेष प्रतिनिधी): नागपूर महानगरपालिकेच्या बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत हिंदी आणि मराठी भाषेचा वाद उफाळून आल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्तापक्षासह विरोधी पक्षाचे नगरसेवक आमने-सामने आल्याने वातावरण कमालीचे तापले होते. नगरसेवकांच्या या गोंधळामुळे संतापलेल्या महापौर नीता ठाकरे यांनी अखेर १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले आणि त्या स्वतःच्या कक्षात निघून गेल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक ॲड. शैलेंद्रद्वारे यांनी १८ जुलै २०२६ रोजी मनपाच्या शिक्षण विभागाकडून आयोजित ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वारकरी डिंडी काढण्याचे आदेश कोणाच्या सूचनेवरून दिले, असा सवाल उपस्थित केला होता. यावर शिक्षण समिती सभापती संतोष देवी लढा यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली असता, नगरसेवक केतन ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण मराठीतच दिले पाहिजे असा हट्ट धरला. “महाराष्ट्राच्या उपराजधानीत मनपाचे कामकाज मराठीतच चालले पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र महापौरांनी ठाकरे यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत पुढील प्रश्न पुकारल्याने विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी याविरोधात जोरदार आक्षेप नोंदवला.
या भाषिक वादात भाजप नगरसेविका अश्विनी जिचकार यांनी हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचे सांगत तिची बाजू लावून धरली. तर भाजपचे वरिष्ठ नगरसेवक बंटी कुकडे यांनीही “हिंदी आपली राष्ट्रभाषा असून मराठी आपली मातृभाषा आहे, त्यामुळे दोन्ही भाषांचा अभिमान बाळगायला हवा; मात्र इंग्रजी सभागृहात नको,” असे स्पष्ट केले. दुसरीकडे, काँग्रेसचे नगरसेवक वसीम खान यांनी राष्ट्रीय वनश्री योजनेबाबतचा प्रश्न हिंदीत मांडण्याची परवानगी मागितली असता, सत्ताधारी नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध केला.
वाढता विवाद पाहता, मनपा आयुक्त डॉ. विपिन इटणकर यांनी नियम १(ई) चा दाखला देत स्पष्ट केले की, सभागृहाचे सर्व कामकाज मराठीत चालणे अपेक्षित असले तरी पीठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीने सदस्य इंग्रजी किंवा हिंदीतही बोलू शकतात. बऱ्याच वेळ चाललेल्या या गदारोळानंतर वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांना शांत केले. राज्यातील ऑटोचालकांना मराठी भाषा सक्तीच्या केलेल्या पार्श्वभूमीवर आता मनपातही या भाषिक वादाचे तीव्र पडसाद उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले.

