LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

नशेच्या पार्टीत रक्ताचा सडा! साकोलीत मित्रांनीच घेतला मित्राचा बळी

अवघ्या १२ तासांत पोलिसांकडून हत्येचा उलगडा; ५ आरोपी जेरबंद
साकोली (भंडारा ) :
शहरातील गडकुंभली रोड परिसरातील तलाव काठावर शुक्रवारी (दि. २२ मे) पहाटे एका युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याने संपूर्ण साकोली तालुक्यात खळबळ उडाली होती. छाती, मान आणि डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून ही निर्घृण हत्या करण्यात आली होती. मात्र, साकोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने कोणतीही ठोस माहिती नसताना तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या १२ तासांत या हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यांच्यासोबत मृतकाने शेवटची रात्र घालवली, त्याच मित्रांनी नशेच्या भरात आणि जुन्या वादातून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
निखिल राजकुमार कांबळे (वय ३०, रा. मुरपार-लेंडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, २१ मे रोजी निखिल आपला मित्र गणेश वलथरे (रा. साकोली) याच्यासोबत दुचाकीने (क्र. एमएच ४० के ५०९९) मूळ गावी मुरपार येथे गेला होता. रात्री कुटुंबासोबत जेवण करून ते पुन्हा साकोलीला परतले. त्यानंतर निखिलने साकोलीत त्याच्या इतर मित्रांना फोन करून एका ठिकाणी बोलावले. तिथे सुरू झालेली नशेची मैफल काही वेळातच वादात बदलली. नशेच्या अंमलाखाली सुरू झालेली अश्लील शिवीगाळ आणि आधीचा राग (खुन्नस) यामुळे मित्रांनी संतापाच्या भरात निखिलवर शस्त्रांनी भीषण प्रहार केले. यात निखिलचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर घाबरलेल्या आरोपींनी गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने निखिलचा मृतदेह गडकुंभली रोडवरील तलावाच्या काठावर आणून फेकला. दुचाकी आणि बॅग तिथेच टाकून ते वेगवेगळ्या दिशेने पसार झाले. मात्र, २२ तारखेला पहाटे तलावाजवळ क्रिकेट खेळायला आलेल्या तरुणांना हा मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
मृतदेहाजवळ कोणताही थेट पुरावा नव्हता. तरीही पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे संशयाची सुई गणेशकडे वळवली. तो नागपूरच्या वाडी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ नागपूर गाठून अत्यंत शिताफीने त्याला आणि कमलेश कुकवास याला अटक केली. तर इतर तीन आरोपींना साकोलीतूनच ताब्यात घेण्यात आले.क्षणभराचा राग आणि नशेच्या अतिरेकामुळे तरुणाई किती हिंसक होऊ शकते आणि आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, याचे हे एक भयंकर उदाहरण साकोलीत समोर आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अटकेतील आरोपी:
१. गणेश मनोहर वलथरे (वय २०, रा. शिवाजी वार्ड, साकोली)
२. कमलेश चुन्नीलाल कुकवास (वय २३, रा. मानेगाव, ता. लाखनी)
३. सागर शंकर पारधी (वय १९, रा. शिवाजी वार्ड, साकोली)
४. ओमकार सुनिल मेश्राम (वय २१, रा. शिवाजी वार्ड, साकोली)
५. एक विधीसंघर्षग्रस्त बालक (अल्पवयीन)
या सर्वांवर साकोली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ मे पर्यंत पोलीस कोठडी
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर, साकोलीचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे आणि त्यांच्या पथकाने केली. न्यायालयाने सज्ञान आरोपींना २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *