LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात ३ दिवसांच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात तणाव, नातेवाईकांचा आक्रोश!

नातेवाईकांचा तीव्र विरोध; पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन
तिरोडा (गोंदिया): तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात अवघ्या तीन दिवसांच्या नवजात बालकाचा अचानक मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालय आवारात प्रचंड खळबळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मातेचा आक्रोश आणि संतप्त नातेवाईकांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेली परिस्थिती पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने समजुतीने हाताळत शांत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील जमुनिया येथील एका गरोदर महिलेला २९ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिने एका गोंडस व निरोगी मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर माता आणि नवजात बालक दोघेही वैद्यकीय कक्षात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते आणि दोघांचीही प्रकृती स्थिर होती.
दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास बाळाची अचानक कोणतीही हालचाल होत नसल्याचे आई व जवळ असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने कक्षातील ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टरांनी बालकाची कसून तपासणी केली असता, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अवघ्या तीन दिवसांत फुलासारख्या निष्पाप जीवाचा अंत झाल्याचे समजताच मातेने व नातेवाईकांनी रुग्णालयात एकच टाहो फोडला.
शवविच्छेदनाला नातेवाईकांचा विरोध; पोलिसांची यशस्वी मध्यस्थी
घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने तात्काळ तिरोडा पोलीस ठाण्याला पाचारण केले. माहिती मिळताच पोलीस हवालदार सुनील नामूर्ती आणि पोलीस अंमलदार मोहित चौधरी यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
दरम्यान, निष्पाप बाळाचे शवविच्छेदन (पोस्टामॉर्टम) करू नये अशी ठाम भूमिका घेत नातेवाईकांनी तीव्र विरोध दर्शवला. यामुळे रुग्णालयात काही काळ कायदे-सुव्यवस्थेचा आणि तणावाचा पेच निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी नातेवाईकांशी समोरासमोर चर्चा करून, अशा प्रकरणांत मृत्यूचे कारण निष्पन्न होण्यासाठी शवविच्छेदन कायदेशीररीत्या किती अनिवार्य आहे हे पटवून दिले. त्यानंतर नातेवाईकांनी संमती दर्शवली आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह शोकाकुल कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
स्तनपानादरम्यान श्वास गुदमरल्याची प्राथमिक शक्यता
या हृदयद्रावक प्रकरणाबाबत बोलताना उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल शेंडे यांनी सांगितले की, “प्रसूतीनंतर बाळ आणि माता दोघांचीही प्रकृती अतिशय उत्तम होती. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार रात्रीच्या वेळी मातेने झोपलेल्या अवस्थेतच बालकाला स्तनपान दिल्याने बाळाचा श्वास गुदमरला (Asphyxia) असावा, अशी दाट शक्यता आहे. तरीही बालकाच्या मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण शवविच्छेदन अहवाल (पीएम रिपोर्ट) आल्यानंतरच अधिकृतरीत्या स्पष्ट होईल.” या प्रकरणाची नोंद करून तिरोडा पोलीस पुढील तपास करत आहेत. अवघ्या तीन दिवसांच्या बाळाचा अचानक असा दुर्दैवी अंत झाल्याने जमुनिया गावासह संपूर्ण तिरोडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *