LatestNewsगोंदियागोंदिया- भंडारा

भागी शिवारात नवनिर्मित इमारतीचा स्लॅब कोसळला! एका मजुराचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

देवरी-आमगाव मार्गावरील दुर्दैवी घटना; ढिगाऱ्याखाली अडकल्याने मजुरांचा आक्रोश, जखमींवर गोंदियात उपचार सुरू
देवरी : देवरी–आमगाव मुख्य मार्गालगत मौजा भागी शिवारात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडलेल्या या भीषण घटनेत एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.दिनेश मदन नाईक (वय ३८ वर्षे, रा. मुल्ला) असे दुर्घटनेत मृत पावलेल्या दुर्दैवी मजुराचे नाव आहे.

काम सुरू असतानाच कोसळला स्लॅब
मिळालेल्या माहितीनुसार, भागी शिवारात नवनिर्मित इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅबचा भलामोठा भाग खाली कोसळला. यावेळी घटनास्थळी काम करत असलेले मजूर थेट ढिगाऱ्याखाली दाबले गेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बांधकामाच्या ठिकाणी एकच आरडाओरड व घबराट निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. गंभीररीत्या जखमी झालेले दिनेश नाईक यांना १०८ रुग्णवाहिकेने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
तिघे गंभीर जखमी; गोंदियाला हलवले
या दुर्घटनेत रुपेंद्र राऊत (वय ३५, रा. कटंगी), भुमेंद्र घासले (वय ३०, रा. मुल्ला) आणि हितेंद्र खोब्रागडे (रा. भडंगा) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देवरी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सुरक्षा उपायांचा अभाव? सखोल चौकशीची मागणी
इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना होत्या का, तसेच निकृष्ट बांधकामामुळे स्लॅब कोसळला का, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण घटनेची प्रशासनामार्फत निष्पक्ष चौकशी करून संबंधित कंत्राटदार व जबाबदारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *