सडक अर्जुनीत खळबळ: ८२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून निर्घृण खून
सोन्याचे दागिने अन् रोख रक्कमेची जबरी चोरी!
पळसगाव-राका येथील धक्कादायक घटना
सडक अर्जुनी : तालुक्यातील पळसगाव-राका येथे घरात एकट्या राहणार्या ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा अज्ञात मारेकर्यांनी गळा आवळून निर्घृण खून केल्याची थरारक घटना आज, बुधवारी, २ सप्टेंबर सकाळी उघडकीस आली. कुसुम चैतराम कापगते (८२) असे मृत वृद्धेचे नाव आहे. हत्येनंतर चोरट्यांनी घरातील आलमारी फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवून नेल्याने संपूर्ण सडक अर्जुनी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे की, कुसुम कापगते या पळसगाव-राका येथे आपल्या घरात एकट्याच वास्तव्यास होत्या. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने किंवा अन्य कारणाने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर कुसुम यांचा गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली. बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सकाळी जेव्हा ग्रामस्थांनी घरात पाहिले तेव्हा घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. चोरट्यांनी घरातील आलमारी फोडून त्यातील दोन सोन्याच्या पाटल्या, इतर सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरीला गेलेल्या एकूण मुद्देमालाचे नेमके मूल्य किती, याचा शोध पोलीस घेत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची घटनास्थळी धाव
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकासह तातडीने पळसगाव-राका गाठून घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद खान यांना प्रकरणाचा सखोल व वेगाने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, डुग्गीपार पोलीस आणि श्वान पथकाने घटनास्थळी दाखल होत महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.
परिसरात भीतीचे वातावरण
मृत कुसुम कापगते यांना तीन अपत्ये आहेत. त्यांचा मुलगा छत्रपती संभाजीनगर येथे अभियंता (इंजिनियर) म्हणून कार्यरत आहे, तर दोन विवाहित मुली अनुक्रमे नवेगावबांध आणि साकोली येथे आपल्या कुटुंबासह राहतात. घरात वृद्ध महिला एकटीच राहत असल्याचे हेरून अज्ञात आरोपींनी हा कट रचल्याचा संशय व्यक्त होत आहे. एकाकी वृद्धेची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या हेतूने केली, या प्रश्नाने गावात भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

