भंडारा एलसीबीची मोठी कारवाई; लुटमारीतील शातिर आरोपी हिंगणघाटमधून गजाआड!
भंडारा अन् पवनीतील जबरन चोरीचे गुन्हे उघडकीस; १.७५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
भंडारा: भंडारा आणि पवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या लुटमारीच्या घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळवले आहे. जनरलसिंग उर्फ मन्नुसिंग रामसिंग टाक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दोन्ही गुन्ह्यांतील सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील यशोदा नगर येथील रहिवासी राजेन्द्र भीमराव चव्हाण हे १२ मार्च रोजी सकाळी फिरण्यासाठी गेले असता, एका अज्ञात व्यक्तीने त्यांना धक्का मारून त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी भंडारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल होता. तसेच २२ जून रोजी पवनी शहरातील मीराबाई रामकृष्ण टिपले यांच्या घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने घुसून अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले होते. याप्रकरणी पवनी पोलिसांत गुन्हा दाखल होता.
हिंगणघाटमधून घेतले ताब्यात
दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना विशेष पथक स्थापन करून तपासाचे निर्देश दिले होते.
यादरम्यान वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याखाली अटक असलेला आरोपी जनरलसिंग उर्फ मन्नुसिंग टाक याने भंडाऱ्यातील गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती मिळाली. भंडारा पोलिसांनी तातडीने हिंगणघाट गाठून आरोपीला ताब्यात घेतले.
गुन्ह्यांची कबुली अन् दागिने जप्त
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने भंडारा आणि पवनी येथे केलेल्या जबरन चोरीच्या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून भंडाऱ्यातील गुन्ह्यातील सोन्याची साखळी आणि पवनीतील गुन्ह्यातील सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

