देवरीत काँग्रेस नेत्या उषाताई शहारे यांच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न,
खाकीच्या नाकाखाली चोरांचा सुळसुळाट; वृद्धेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
देवरी (गोंदिया) : देवरी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील चिचगड रोड परिसरात सोमवारी मध्यरात्री ९ ते १० अज्ञात, संशयित दरोडेखोरांनी गोंदिया जिल्हा परिषद सदस्या तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उषाताई शहारे यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केले. मात्र, शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या सतर्कतेमुळे आणि त्यांनी केलेल्या आरडाओरडीमुळे चोरट्यांचा डाव फसला आणि एक मोठी अनर्थाची घटना थोडक्यात टळली. या घटनेमुळे संपूर्ण देवरी शहरात तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारच्या मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास ९ ते १० संशयित तरुण उषाताई शहारे यांच्या घराच्या आवारात आणि परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. हे सर्व तरुण घरात शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच, शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेची नजर त्यांच्यावर पडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या वृद्धेने कसलाही विचार न करता तात्काळ मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या गदारोळामुळे दरोडेखोर चक्रावले आणि आपला डाव उधळला गेल्याचे लक्षात येताच सर्व संशयित तरुण अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.
विशेष म्हणजे, ही घटना देवरी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आणि चिचगड रोडसारख्या अत्यंत गजबजलेल्या मुख्य मार्गावर घडली आहे. मुख्य रस्त्यावरच जर लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या घरांवर असे धाडसी दरोड्याचे प्रयत्न होत असतील, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्त म्हणजेच पेट्रोलिंग व्यवस्थेचे पार वाभाडे निघाले आहेत. नागरिकांमधून पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता देवरी पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे. हा प्रकार केवळ घरफोडीच्या उद्देशाने झाला होता, की यामागे कोणताही राजकीय किंवा वैयक्तिक घातपाताचा गंभीर हेतू होता, यादिशेनेही पोलीस शोध घेत आहेत. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्याचे काम सुरू असून, संशयितांची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेनंतर देवरी शहरातील मुख्य मार्गांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. मुख्य रस्त्यांवर आणि संवेदनशील भागात रात्रीची पोलीस गस्त तात्काळ वाढवण्यात यावी, अशी आग्रही मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे. आता पोलीस या टोळीचा छडा लावण्यात किती यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

