वीज गेल्याने बाथरुममध्ये भीषण दुर्घटना; अंगावर गरम पाण्याची बादली सांडल्याने ८ वर्षीय मुलीचा मृत्यू
जरीपटक्यातील आंबाटोली येथील दुर्दैवी घटना
उपचारादरम्यान चिमुरडीची प्राणज्योत मालवली
नागपूर (१ सप्टेंबर): अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारलेल्या बाथरुममध्ये ठेवलेली उकळत्या पाण्याची बादली अंगावर उलटून गंभीररीत्या भाजलेल्या ८ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही मन सुन्न करणारी हृदयद्रावक घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर, आंबाटोली येथे घडली.
तेजस्विनी तेज आहके (वय ८ वर्षे) असे मृत मुलीचे नाव असून, ती आपल्या कुटुंबीयांसह तेथे भाड्याच्या घरात राहत होती.
अंधारात पाय लागून बादली अंगावर उलटली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली असतानाच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. बाथरुममध्ये आधीच आंघोळीसाठी कडक गरम पाण्याने भरलेली बादली ठेवण्यात आली होती. अचानक झालेल्या अंधारामुळे तेजस्विनीचा अंदाज चुकला आणि तिचा धक्का गरम पाण्याच्या बादलीला लागला. त्यामुळे उकळत्या पाण्याने भरलेली बादली थेट तिच्या अंगावर उलटली. या दुर्घटनेत तेजस्विनीची छाती, पोट, कंबर, खांदे तसेच दोन्ही पायांसह शरीराचा सुमारे ६६ टक्के भाग गंभीररीत्या भाजला. कुटुंबीयांनी तिला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल केले; मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी तिचे वडील तेजस अर्जुन आहके (वय ४० वर्षे) यांचा जबाब नोंदवून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

